औरंगाबाद : वाळूज गट नं. ३८ येथील फायजर हेल्थ केअर या औषधनिर्माण कंपनीचा प्रकल्प अचानक बंद करण्यात आल्यामुळे ७०० कर्मचाऱ्यांचे भवितव्य टांगणीला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत कंपनी व्यवस्थापनाने जाहीरपणे कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र कंपनी कर्मचाऱ्यांचा हिशेब वनटाईम सेटलमेंट करून चुकता करण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योग वर्तुळातून पुढे येत आहे.
फायजर कर्मचाऱ्यांना भारतातील इतर प्रकल्पांत सामावून घेणार नाही. त्यांना आर्थिक सहाय्य करणार असल्याचा निर्णय फायजरच्या व्यवस्थापनाने घेतल्याची माहिती समोर येत आहे. तोटा होत असल्याचे कारण देऊन फायजरने निर्यातक्षम उत्पादन करणारा वाळूज येथील प्रकल्प ७ रोजी बंद करण्याचा निर्णय घेऊन उद्योगविश्वाला मोठा हादरा दिला. कायदेशीररीत्या कोणतेही सोपस्कार कंपनीने पूर्ण केले की नाही, याबाबत कुठलीही माहिती न देता कंपनीने गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला. २०१९ या वर्षात कंपनीने चेन्नई आणि औरंगाबाद येथील दोन प्रकल्प बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्या. त्या कंपनीत काम करणाऱ्या उच्चशिक्षित ७०० कर्मचारी एका झटक्यात बेरोजगार झाले आहेत.
फायजर जे वेतन त्या कर्मचाऱ्यांना देत आहे, त्या तुलनेत इतर कंपन्यांत वेतन मिळणेही अवघड आहे. कंपनीने प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ७०० जणांचे काय करणार, याची माहिती फायजर व्यवस्थापनाने दिली नव्हती.
सर्व काही गुलदस्त्यात वाळूजमधील गट नं. ३८ येथील अमेरिकन कंपनी फायजर हेल्थ केअरचा (हॉस्पिरा) प्रकल्प मंगळवारी अचानक बंद करण्यात आल्यामुळे उद्योग वर्तुळासह औरंगाबादच्या अर्थकारणाला वार्षिक १२५ कोटींहून अधिक फटका बसला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे वेतन आणि फायजरवर आधारित असलेल्या छोट्या कंपन्यांना मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. ४कर्मचाऱ्यांना इतर प्रकल्पांत सामावून घेणार काय, याचे उत्तर कंपनी देण्यास तयार नाही. भविष्यात जे काही निर्णय कंपनी घेईल, ते समोर येतील असे चित्र सध्या आहे. वनटाईम सेटलमेंटची चर्चा उद्योग वर्तुळात आहे, पण किती रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे.