औरंगाबाद : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीची चर्चा सुरू झाली आहे. ते मुंबईला बदलून जाणे शक्य असून, त्यांच्या जागेवर येण्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा लागली आहे. स्पर्धेमुळे औरंगाबादचे नवीन जिल्हाधिकारी कोण, याबाबत आता उत्सुकता आहे.
चौधरी यांची गेल्या वर्षीच बदली होणार होती; परंतु विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बदलीला ब्रेक लागला. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये प्रशिक्षण घेऊन आल्यानंतरच चौधरी यांची बदली होणार अशी चर्चा सुरू झाली होती. ते १५ मार्च रोजी प्रशिक्षणावरून आले आणि त्यादरम्यानच कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने उपाययोजनांची सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांची बदली होऊ शकली नाही. आता त्यांची बदली होण्याचे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.
राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना झाल्या असून, पूर्ण प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे काम करीत आहे. त्यामुळे नवीन बदलून येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना येथे काम करताना काहीही अडचणी येणार नाहीत, अशी शासनाची धारणा झाल्यामुळे जिल्हाधिकारी चौधरी यांचा बदली होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, याबाबत मला काहीही माहिती नाही. बदलीचे निर्णय शासन स्तरावर होतात.