वाळूज महानगर : महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर अर्थात ‘मसिआ’ संघटनेतर्फे आयोजित बैठकीत वाळूज उद्योगनगरीतील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत उद्योजकांनी तक्रारींचा पाढा वाचत शासनाकडून प्रश्न निकाली निघत नसल्याची खंत व्यक्त केली.
वाळूज उद्योगनगरीत अनेक उद्योजकांनी छोटे-छोटे उद्योग सुरु केले आहेत. आजघडीला ‘मसिआ’ संघटनेचे १२५० सभासद असून, या उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात एमआयडीसी व शासनाकडे पाठपुरावा करुनही प्रश्न निकाली निघत नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. एल सेक्टरमध्ये एकच रस्ता असल्याने पर्यायी रस्त्यासाठी उद्योजकांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, एमआयडीसीकडून निविदा प्रक्रिया सुरु झाली असून, लवकरच रस्त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरु होत नसल्याने उद्योजकांनी डोकेदुखी वाढली आहे.
तसेच बी सेक्टरमध्ये गत अनेक वर्षांपासून अघोषित कचरा डेपो असून याठिकाणी कचऱ्याला अनेकावेळा आग लावण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रदुषण वाढत असून, कारखान्यांना आग लागण्याची भिती वर्तविली जात आहे. उद्योगनगरीतील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सर्वच सेक्टरमधील रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी उद्योजकांकडून केली जात आहे. उद्योगनगरीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून, कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे उद्योजकांना अर्थिक भुर्दंड सहन करुन पिण्यासाठी जारचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. स्वच्छ व हरीत एमआयडीसी अंतर्गत उद्योजक संघटनांनी पुढाकार घेऊन या परिसरातील ग्रीन बेल्टमध्ये हजारो झाडे लावून ही झाडे जगविली आहेत.
मात्र अनेक ठिकाणी तारेचे संरक्षक कुंपन नसल्याने जनावरांकडून झाडाची नासधूस केली जात आहे. याशिवाय ग्रीन बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणात मुरुमाची चोरी केली जात असल्याने झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उद्योगनगरीतील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी एमआयडीसी प्रशासनही गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या परिसरात भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्याची मागणी उद्योजकांनी ‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी व पदाधिकाºयाकडे केल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख मनिष अग्रवाल,सह प्रसिध्दी प्रमुख शेख अब्दुल यांनी कळविले आहे.