लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला. जमावाने उपकेंद्रावर दगडफेक करून तेथील सामानांची तोडफोड केली आणि कर्मचाºयांना धक्काबुक्की केल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी करून ग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर सुमारे तासभर ठिय्या दिला. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.रोशनगेट, जिन्सी, मध्यवर्ती जकात नाका आदी भागांत भारनियमनानंतरही विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचा संयम सुटला व जमावाने रोशनगेट उपकेंद्राची तोडफोड केली.सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुपारच्या सत्रातील भारनियमन बंद झाले आणि एकाच वेळी घराघरांतील विद्युत उपकरणे सुरू झाली. त्यामुळे विद्युत वाहिन्यांवर भार वाढला व मध्यवर्ती जकातनाका येथे स्मशानभूमीजवळ ३३ के.व्ही.ची वाहिनी तुटली. त्यामुळे बायजीपुरा उपकेंद्रांतर्गत ४ फिडर, तर रोशनगेट उपकेंद्रांतर्गत ३ फिडर बंद पडले. परिणामी, रोशनगेट, अजम कॉलनी, कटकटगेट, मकसूद कॉलनी, किराडपुरा, आझाद चौक या परिसरात सुमारे १५ हजार घरे अंधारात होती.तथापि, काही वेळातच महावितरणचे अधिकारी- कर्मचारी ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यासाठी पोहोचले; परंतु केवळ आमच्या परिसरातच भारनियमन का लादले जाते, असा प्रश्न उपस्थित करून तेथे मोठा जमाव जमला. त्यांनी महावितरणच्या अधिकारी- कर्मचाºयांना ३३ के.व्ही.ची तुटलेली वाहिनी जोडण्यास अडचण निर्माण केली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी ही बाब तात्काळ पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर, निरीक्षक निर्मला परदेशी आणि कर्मचाºयांनी तेथे धाव घेतली. तब्बल ३ तासांनंतर रात्री १० वाजेच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात विद्युतवाहिनी जोडण्याचे काम सुरू झाले.अमरप्रीत चौकातील उपकेंद्रावर धाव४मदनी चौक, रोशनगेट भागात झालेल्या तोडफोडीनंतर अमरप्रीत चौकातील महावितरणच्या कार्यालयावरही फकीरवाडी, बापूनगर, खोकडपुरा आणि चुनाभट्टी भागातील नागरिकांनी रात्री १०.३० वाजता धाव घेतली. दुपारी साडेतीन वाजेपासून वीज पुरवठा खंडित असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. शिवाय महावितरणचे कर्मचारी फोन घेत नाहीत आणि वीज पुरवठा कधी सुरळीत होईल हे सांगत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. शेकडो नागरिक महावितरणच्या कार्यालयावर धडकल्याचे कळताच क्रांतीचौक पोलिसांनी तेथे धाव घेतली.
महावितरणच्या कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:15 AM
किरकोळ पावसाने शहरातील विविध भागांतील खंडित झालेला वीज पुरवठा वेळेत सुरू न झाल्याने संतप्त ग्राहकांनी महावितरणच्या मदनी चौकातील वीज उपकेंद्र आणि फ्यूज कॉल सेंटरवर सोमवारी रात्री हल्ला केला.
ठळक मुद्देमदनी चौैकातील घटना : आठ तास वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त नागरिकांचा उद्रेक; कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की