छत्रपती संभाजीनगर : धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के खाटा गरीब, दुर्बल घटक व निर्धन घटकातील रुग्णांसाठी राखीव आढळल्या नाहीत, तर तो हक्कभंग समजला जाईल. यासंदर्भात ‘एसओपी’, गाइडलाइन तयार होत आहे, शिवाय ॲपही तयार केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही ॲपद्वारे कुठल्या रुग्णालयात १० टक्के खाटा रिक्त आहेत, हे पाहता येईल.
या रुग्णालयांची पथकांकडून अचानक पाहणी केली जाईल. काही झोल आढळला, तर रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी सांगितले. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रापासून जिल्हा रुग्णालये रुग्णांनी ओसंडून वाहतात. त्या ठिकाणी खासगी रुग्णालयात जात नाहीत. मोठी व्यवस्था असूनही प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून आपली जिल्हा रुग्णालये ओस पडतात. खासगी रुग्णालयात गर्दी होते. त्यामुळे आंध्र प्रदेश, केरळ या ठिकाणी भेट देऊन, त्यांच्या आणि आपल्या येथील सुविधांत काय फरक आहे, याचा अभ्यास करून अहवाल तयार करावा, अशी सूचना डाॅ. सावंत यांनी बैठकीत केली.