ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 17 - चलनातून 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्यामुळे काळा पैसा धारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. अनधिकृत व्यवसाय करणारे यामुळे काळा पैशांची निरनिराळ्या पद्धतीने विल्हेवाट लावत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याचाच एक भाग म्हणून, शहरातील गारखेडा सूतगिरणी चौक परिसरात 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे फाडून कच-यात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी 9.30 ते 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गारखेडा सूतगिरणी चौकातील कासलीवाल, कांकारीया यांच्या रिकाम्या असलेल्या भूखंडावर या 500 रुपयांच्या जुन्या नोटांचे तुकडे आढळून आले. घटनास्थळापासून काही अंतरावर दारूचे दुकान आहे. हे दुकान उघडण्यासाठी वाट काही तळीराम पाहत असताना त्यातील काही जणांना नोटांचे तुकडे पाहिले. यातील काही जणांनी नोटा उचलल्या देखील.
सुमारे दोन ते तीन लाख रुपये असावे
फाटक्या नोटा पडलेल्या असल्याचे पाहून अनेक प्रत्यक्षदर्शी तेथे जमा झाले होते. याच वेळी एका आय.टी. कंपनीत काम करणारा राजेश लिमकर हा तरुण तेथून जात होता. यातील काही नोटा त्याने पोलिसांकडे जमा केल्या. याविषयी राजेश म्हणाले की, तेथे पडलेल्या सर्व पाचशे रुपयांच्या नोटा होत्या. या नोटांचे छोटे-छोटे तुकडे करण्यात आले होते. सुमारे तीन ते चार लाख रुपये असावेत.
फेकलेल्या नोटांची रोकड कमी
देशी दारूच्या दुकानाशेजारी कच-यात फेकण्यात आलेल्या रद्द करण्यात आलेल्या 500 रुपयांच्या दोन ते चार हजाराच्या नोटा होत्या. या नोटा चलनात आणणे शक्य नसल्याने कुणीतरी त्यांचे तुकडे तुकडे करून फेकून दिल्या आहेत. तेथे एक आधारकार्डही सापडले आहे. मात्र त्या नोटा आधार कार्डधारकाच्या आहेत अथवा अन्य कोणाच्या? हा तपासाचा भाग आहे. या नोटा चलनातून बाद झालेल्या असल्याने त्यांचे मूल्य शून्य असल्याचे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर म्हणाले आहेत.
भारत नगर परिसरातही आढळल्या नोटा
दरम्यान, भारत नगर परिसरातही रद्द करण्यात आलेल्या नोटांचे तुकडे आढळून आले. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी नोटांचे तुकडे जप्त केले असून अधिक तपास सुरू आहे.