वाळूज महानगर : बजाजनगरसह वडगाव हद्दीतील जमा झालेल्या कचºयाची येथील खदाणीतच विल्हेवाट लावली जात आहे. दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे ऐन सणासुदीच्या काळात आजाराला आमंत्रण मिळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
बजाजनगर नागरी वसाहतीची साफ-सफाई व कचरा उचलण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. एमआयडीसीने हे काम एका खाजगी ठेकेदाराला दिले आहे. ठेकेदाराचे कर्मचारी नागरी वसाहतीतील संकलित केलेला कचरा वाहनात भरुन रामलीला मैदानासमोरील खदाणीच्या जागेवर टाकत आहेत.
वडगावातील कचºयाबरोबरच व्यवसायिक व भाजीपाला विक्रेत्याकडूनही येथेच कचरा टाकला जात आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढला आहे. शिवाय येथेच कचरा जाळला जात असल्याने प्रदूषणही वाढत आहे. घाणीमुळे नागरिकांना साथ रोगाची लागत होत असून लहान मुले सारखी आजारी पडत आहेत.
उग्र वासामुळे मळमळ, उलटी, डोकेदुखी आदीचा त्रास नागरिकांना सुरु झाला आहे. या प्रकारामुळे ऐन सणासुदीच्या काळात आजाराला आमंत्रण मिळत आहे. इतरत्र जागा असतानाही नागरी वसाहतीत असलेल्या खदाणीत कचºयाची विल्हेवाट लावली जात असल्याने एमआयडीसी प्रशासनाविषयी नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.