औरंगाबाद : खा. इम्तियाज जलील आणि माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्यात गुरुवारी विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील आढावा बैठकीत खुर्ची नाट्य रंगले. या नाट्यामुळे खैरे माध्यम प्रतिनिधींवर संतापले, तर खा. जलील म्हणाले, त्यांना खुर्चीची लागलेली सवय सुटत नाही, त्याला मी काय करू शकतो. मुख्यमंत्र्यांनी खुर्चीपेक्षा आमच्या मागण्यांकडे जास्त लक्ष दिल्याचे खा. जलील यांनी यावेळी नमूद केले. हा प्रकार मुख्यमंत्र्यांसमक्ष घडल्याने त्यांनी याची नोंद घेतली आहे, असेही ते म्हणाले.
आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याच्या बैठकीदरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या खुर्चीचा ताबा घेतल्याची माहिती बाहेर आली. खा. जलील यांचे नाव असलेल्या खुर्चीवर खैरे जाणूनबुजून बसले. त्यामुळे जलील यांना इतरत्र बसावे लागले होते. यावर खा. जलील म्हणाले की, बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींची नेमप्लेट तयार करण्यात आली होती. ती खुर्चीसमोर होती. त्यानुसार खैरेंनी त्यांच्या नेमप्लेटच्या खुर्चीवर बसणे गरजेचे होते. खैरे माझ्या खुर्चीवर बसल्यामुळे मी दुसरीकडे बसलो होतो. मी कुठे बसलो यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नांना न्याय दिला, हे महत्त्वाचे आहे. माजी खा. खैरे यांना खुर्चीची सवय असून, ती अद्याप गेली नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नांबाबत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या.