औरंगाबाद : विद्यार्थ्यांची फी कमी करण्यावरून पालक आणि शाळेतील लिपिक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्यात हाणामारी झाल्याची घटना कटकटगेट परिसरातील प्राईम स्टार इंग्रजी शाळेत ३० जुलै रोजी सकाळी घडली. याविषयी जिन्सी ठाण्यात परस्परविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, प्राईम स्टार इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका मंगळवारी सकाळी त्यांच्या कार्यालयात असताना आरोपी शेख गौस शेख इब्राहिम हा अचानक तेथे आला. त्यांनी त्यांची भाची तुबा अन्सारीचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी वाद घातला आणि त्यांची छेड काढत त्यांना ढकलून दिले. यावेळी तेथे आलेले संस्थाचालक जियाउद्दीन आणि त्यांच्या दोन मुलांनाही गौस यांनी शिवीगाळ करून माहिती अधिकार समितीचा सदस्य असल्याचे सांगून तुम्ही शाळा कशी चालविता अशी धमकी दिली. तसेच संस्थाचालकांना मारहाण केल्याची तक्रार मुख्याध्यापिकेने नोंदविली. यावरून पोलिसांनी शेख गौसविरोधात गुन्हा नोंदविला.
तर गौस यांनी तक्रारीत नमूद केले की, त्यांची भाची तुबा अन्सारी ही आरोपीच्या शाळेत शिकत आहे. फीस भरण्यासाठी ते शाळेत गेले असता लिपिक महिलेने जास्त फीस आकारणी केल्याचे दिसले. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एप्रिल आणि मे महिन्यातील शैक्षणिक शुल्क घेता येत नाही, असे आपण त्यांना सांगितले असता संस्थाचालक जियाउद्दीन, त्यांची दोन मुले आणि मुख्याध्यापिका यांनी मारहाण करून आपला एक दात पाडला. यापुढे शाळेत आला तर तुझ्या तंगड्या तोडू, अशी धमकी त्यांनी दिली. जिन्सी पोलिसांनी संस्थाचालक, त्यांची दोन मुले आणि मुख्याध्यापिकेविरोध्द गुन्हा नोंदविला.
८ दिवस २ मुख्याध्यापकांना मारहाणऔरंगाबाद जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने बुधवारी सकाळी पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. आठ दिवसांत दोन शाळांमध्ये मुख्याध्यापकांना मारहाणीच्या घटना घडल्याचे नमूद केले. ३० जुलै रोजी मुख्याध्यापिकेला शाळेशी संबंध नसलेल्या व्यक्तीने मारहाण केल्याचे नमूद केले. अशा व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी बालाजी पवार, प्रल्हाद शिंदे, मनोज पाटील आदींचा समावेश होता.