छत्रपती संभाजीनगर : अकरा दिवसांवर लग्न आलेल्या अल कुतूब हबीब हमद या तीस वर्षीय तरुणाची एका गुंडाने छातीत गोळ्या झाडून हत्या केली. अवघ्या साडेसात हजारांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोळी मारल्यानंतर हल्लेखार फयाज पटेल पंधरा-वीस सेकंद मृताच्या मृतदेहावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होता. न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. दरम्यान, वीस दिवसात सलग तिसऱ्या गाेळीबाराच्या घटनेने शहरातली गुन्हेगारी गंभीर वळणावर गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
हल्लेखोर फयाज व मृत हमद एकमेकांच्या ओळखीचे होते. आईला एकुलता एक मुलगा असलेला हमद हुसेन कॉलनीत आईसोबत राहत होता. तो पैठणगेटच्या कपड्याच्या दुकानात नोकरीला होता. २० ऑगस्ट रोजी त्याचे लग्न आहे. तो बुधवारी दुकानातून लवकर काम आटोपून घरी परतला होता. साडेसहा वाजता तो न्यू बायजीपुऱ्यात टेलरकडे गेला होता. टेलरला कपड्यांच्या मापासाठी सूचना करून तेथेच मित्रांसोबत आनंदात चहा प्यायला. त्यानंतर साडेसात वाजता हयात क्लिनिकसमोर येऊन उभा राहिला. काळा कुर्ता, पांढरा पायजमा परिधान केलेला फय्याज क्लिनिकच्या विरुध्द दिशेच्या सम्राट अशोक बुद्धविहारासमोर उभा होता. कुतूब दिसताच फयाजने कुर्त्यातून बंदूक काढून थेट छातीत गोळ्या घातल्या. कुतूब क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व तेथेच मृत्यू झाला. भर गर्दीत ही घटना घडली.
‘अपुनने नौ राऊंड की पिस्टल लाई’गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मारेकरी फयाज नशेखोर असून परिसरात स्वत:ला मोठा गुंड समजतो. गेल्या महिनाभरापूर्वीच पिस्टल खरेदी केल्यापासून तो खुलेआम ‘अपुन ने नौ राऊंड की पिस्टल लाई है, एक दिन निशाना लगाएंगे’ असे वारंवार म्हणत होता. परंतु पोलिसांपर्यंत हे पोहोचले नाही. तीन दिवसांपासून त्याच्यात व हमदमध्ये धुसफूस सुरू होती. बुधवारी मात्र वादाचे थेट हत्येत रूपांतर झाले. घटनेच्या काही तास आधीच फय्याज ने ‘तुम्हारा सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आयेगा’ असे स्टेटस ठेवत इशारा दिला होता.
तरीही हमद समोर चालत आलाक्लिनिकसमोर हमद, तर विरुद्ध दिशेला बुद्धविहारासमाेर फय्याज उभा होता. फय्याजने पिस्टल काढलेले हमदने पाहिले. तरीही तो त्याच्या दिशेने चालत गेला. पहिली गोळी त्याच्या कानापासून मागे जात रुग्णालयात मुलाला तपासणीसाठी आलेल्या समीर पठाण यांच्या उजव्या हातातून आरपार गेली. तरीही हमद हटला नाही व फय्याजची दुसरी गोळी थेट त्याच्या छातीत घुसली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या हमदच्या डोक्यात फय्याज पंधरा- वीस सेकंद पायाने मारहाण करत होता. जवळच बसलेल्या एका वृद्धाने धाव घेत फय्याजला दोन्ही हातांनी पकडून बोळीत नेले. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. घटनेनंतर पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, धनंजय पाटील यांनी धाव घेतली. सर्व ठाण्यांच्या निरीक्षक, उपनिरीक्षकांना दाखल होण्याचे आदेश जारी झाले. जिन्सीचे निरीक्षक रामेश्वर रेंगे, सिटीचौकच्या निर्मला परदेशी, जवाहरनगरचे व्यंकटेश केंद्रे, क्रांतीचौकचे संतोष पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.