औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि ग्रामीण अध्यक्षपदावरून पक्षात बराच बेबनाव असल्याचे सोमवारी समोर आले. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अनुक्रमे शिरीष बोराळकर आणि विजय औताडे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त सोमवारी दुपारीच सोशल मीडियात झळकले. मात्र सायंकाळी बोराळकर यांना पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाला ‘चकवा’ मिळाल्याची चर्चा सुरू झाली.
औरंगाबाद भाजपच्या शहराध्यक्षपदी बोराळकर आणि ग्रामीणच्या अध्यक्षपदी औताडे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त दुपारी आले होते. भाजपच्या शहरातील वरिष्ठांनी यास दुजोराही दिला होता. मात्र मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिरीष बोराळकर यांचा समावेश पक्षाच्या प्रवक्तेपदात होता. तर विजय औताडे यांचे नावही नव्हते. मागील तीन दिवसांपासून बोराळकर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू होती. प्रदेशाध्यक्ष पाटील हे संघाच्या बैठकीसाठी शनिवारी शहरात आले होते. तेव्हा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त होते. मात्र नियुक्तीच्या काही वेळापूर्वी महत्त्वाच्या घडामोडी घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐनवेळी औरंगाबादचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड थांबविण्यात आल्याचे समजते. यात वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचा समावेश असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
भाजप प्रदेश कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बोराळकर यांना प्रदेश प्रवक्तापदी कायम ठेवण्यात आले आहे. याविषयी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्याश्ी संपर्क साधला असता, त्यांनी सुरुवातीला बोराळकर आणि औताडे यांची नियुक्ती झाल्याचे सांगितले. मात्र प्रदेश कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही नावे नसल्याचे लक्षात आणून दिले असता त्यांनी माहिती घेतो, असे स्पष्ट केले. थोड्या वेळानंतर डॉ. कराड यांनीच औरंगाबाद शहर भाजपात कोणताही बदल झालेला नसल्याची माहिती दिली. यावरून वरिष्ठ नेत्यांमध्येच बेबनाव असल्याचे समोर आले आहे.
संजय केणेकर यांना केले संघटनेतून पदमुक्तप्रदेश भाजप कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात कामगार आघाडीचे संयोजक संजय केणेकर यांना पदमुक्त करण्यात आले आहे. अन्य जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक कारणामुळे पदमुक्त केल्याचे स्पष्टीकरण भाजपतर्फे देण्यात आले आहे.