औरंगाबाद : सेव्हनहिल उड्डाणपुलाच्या जवळच्या जागृत पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तुफान राडा झाला. ५० रुपयाचे पेट्रोल भरण्यावरुन दुचाकी चालकाने गल्लीतील १० ते १५ जणांना बोलावुन घेत पंपावरील कर्मचारी, व्यवस्थापकासह त्यांच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा नोदंवला आहे.
पंपावरील कर्मचाऱ्यासह त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण करुन निघून गेलेल्या टवाळखोरांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मारहाण झालेल्यांनाच दमदाटी केल्याचा प्रकारही घडला. पंपाचे व्यवस्थापक शेख हबीबुद्दीन शेख हमीतुद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा एक कर्मचारी गाड्यांमध्ये पेट्रोल टाकत होता. तेव्हा एकजण दोन लहान मुलांसह पेट्रोल टाकण्यासाठी आला. त्याने दुचाकीत (एमएच २० डीझेड ३६६०) ५० रुपयांचे पेट्रोल भरण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने पेट्रोल टाकल्यानंतर चालकाने पेट्रोल कमी टाकल्यावरुन वाद सुरु केला. तेव्हा दुचाकीस्वाराने पाच मिनिटात चार-पाच लोकांना बोलावून घेत पंपावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली. कर्मचाऱ्याने ही माहिती भावाला फोनवरुन सांगितली. तेव्हा कर्मचाऱ्याचा भाऊ, आई-वडिल पंपावर आले. यानंतर काही वेळातच १० ते १५ जणांचा जमाव लाठ्या,काठ्यासह हातात चाकू घेऊन पंपावर आला. त्यांनी कर्मचाऱ्यास पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला सोडविण्यासाठी त्याचे भाऊ, आई-वडिल आतमध्ये पडले. त्यांनाही बेदम मारले. पंपाच्या व्यवस्थापकासह इतर कर्मचाऱ्यांनाही टोळक्याने बेदम मारहाण करुन निघून गेले.
बातमीदारी करणाऱ्या २ पत्रकारांनाच पोलिसांनी नेलेतेवढ्यात पुंडलिकनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. मारहाण करणारे त्यांच्या समोरुनच निघुन गेले. त्यानंतर पोलिसांनी मारहाण झालेल्यांनाच दमदाटी केली. तसेच वार्तांकनासाठी घटनास्थळी आलेल्या दोन रिपोर्टरला पोलिसांच्या गाडीत टाकून ठाण्यात नेले. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी मारहाण झालेल्यांना बोलावून घेत दहा ते पंधरा आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न, विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.