औरंगाबाद : स्थायी समितीमधील १६ पैकी १५ सदस्यांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. त्यातील सेनेच्या ५ सदस्यांचा समावेश आहे. बंड थोपविण्यासाठी सेना सदस्यांवर पक्षीय दबाव टाकण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. प्रकरण अधिक पेटण्यापूर्वी सेना सदस्य स्थायीमधील वाद थेट ‘मातोश्री’वर नेणार आहेत. त्यामुळे सभापती राजू वैद्य यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.
स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी महिनाभरापूर्वी ३६ कोटी रुपयांचा एक ठराव मंजूर केला. या ठरावात वाळूज येथील मायोवेसल कंपनीला कचरा प्रक्रियेचे काम देण्यात आले. हा ठराव ऐनवेळी सभागृहात आणून मंजूर करण्यात आला. या ठरावावर अजिबात चर्चा झाली नाही. ज्या कंपनीला मनपा प्रशासन काम देणार आहे, त्या कंपनीने देशात कुठे-कुठे चांगले काम केले याचा अहवाल द्यावा, एवढीच सदस्यांची रास्त मागणी आहे. मनपा प्रशासन आणि सभापती या मागणीकडे अधिक गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे स्थायी समितीमधील सेनेचे पाच, एमआयएमचे चार आणि चार भाजप-अपक्षांनी बंडाचा झेंडा रोवला आहे.
सोमवारी खा. चंद्रकांत खैरे यांनी स्थायीमधील सेनेच्या ५ सदस्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. आता सर्व १५ सदस्य नगरसचिव दिलीप सूर्यवंशी यांना निलंबित करा, सभापतींचे अधिकार काढा, अशी मागणी करीत आहेत. दोन्ही मागण्या नियमाला अनुसरून नाहीत. सभापतींवर अविश्वास ठराव आणता येऊ शकतो का? याचीही चाचपणी सदस्यांनी केली. मात्र, कायद्यात अशी तरतूदच नाही. त्यामुळे सेनेचे पाच सदस्य न्यायासाठी थेट मातोश्रीवर धाव घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
चित्र बदलणार नाहीस्थायी समितीमधील १५ सदस्यांनी यापुढे एकाही बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजू वैद्य एकाकी पडले आहेत. त्यांनी बैठक आयोजित केली तरी कोणताच निर्णय घेता येणार नाही. स्थायीत कोणताही ठराव मंजूर करण्यासाठी किमान ७ सदस्यांचे बहुमत असणे आवश्यक आहे. सेनेच्या पाच सदस्यांनी बंडातून माघार घेतली तरी उर्वरित १० सदस्य ठाम राहणार आहेत.