राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सहा महाविद्यालयांतील शेकडो प्राध्यापक, कर्मचाºयांचे पगार दोन महिन्यांपासून थकले आहेत. संस्थाचालकांना मर्जीतील प्राचार्य हवा आहे. मात्र, संस्थाचालकांनी नेमलेल्या अपात्र प्राचार्यांना विद्यापीठ प्रशासन, उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालय मान्यता देत नाही. याचा नाहक त्रास प्राध्यापकांना सहन करावा लागत आहे.खाजगी शिक्षण संस्थांतील प्राध्यापक, शिक्षकांना संस्थाचालकांच्या दहशतीखालीच ज्ञानदान करावे लागते. निवडणुका, कार्यक्रमांना वर्गणीही द्यावी लागते. तरीही आपल्या मर्जीतील व्यक्तीलाच प्राचार्यपदी बसविण्याचा हव्यास संस्थाचालकांना असतो. या हट्टापायी चुकीच्या व्यक्तीची नेमणूक होते. मात्र, या नेमणुकीला विद्यापीठ, उच्च शिक्षण सहसंचालक मान्यता देत नाहीत. याचा फटका महाविद्यालयामध्ये काम करणाºया प्राध्यापक, कर्मचाºयांना बसतो. नवीन नियमांप्रमाणे प्राचार्यपदी विद्यापीठाने मान्यता दिलेली सक्षम व्यक्ती नसेल तर पगारपत्रकच मान्य करण्यात येत नाही. याचा फटका विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सहा महाविद्यालयांतील प्राध्यापकांना बसला आहे. यात औरंगाबाद शहरातील स. भु. विज्ञान महाविद्यालय, सोयगावचे संत ज्ञानेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिंचोली (लिंबाजी) येथील कला महाविद्यालय, नळदुर्गचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एम. एस. चौधरी कला महाविद्यालयल तीर्थपुरी आणि भोकरदन येथील मोरेश्वर महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयातील प्राध्यापकांचे पगार सक्षम प्राचार्यांच्या निवडीअभावी दोन महिन्यांपासून रखडले आहेत.बीड जिल्ह्यातील कडा येथील अमोलकचंद जैन महाविद्यालय, जालना येथील श्रीमती दानकुँवर कला, वाणिज्य व महिला महाविद्यालय आणि इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाच्या संस्थाचालकांच्या वादांमुळे येथील प्राध्यापकांचे पगार रखडले होते. मात्र, त्याठिकाणी नुकताच तोडगा निघाल्याचे समजते.
वाद संस्थाचालकांत ताप प्राध्यापकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:59 AM