पैठण : पैठण तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीचे आरक्षण शनिवारी काढण्यात आले. यातील ८० ग्रामपंचायतींची निवडणूक झाल्यानंतर तर २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आल्याने मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासनाने निवडणूक पूर्व काढलेले आरक्षण रद्द केलेले असताना पैठण तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीचे आरक्षण निवडणूक पूर्व काढण्यात आले आहे.
पैठण तालुक्यात १०८ पैकी ८० ग्रामपंचायतीच्या निवडणूका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. उर्वरित २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका दुसऱ्या टप्प्यात होणार असून या निवडणुकांना अद्याप दोन वर्षाचा अवधी बाकी आहे. परंतु शनिवारी तहसील प्रशासनाने चक्क १०८ ग्रामपंचायतीचे आरक्षण काढल्याने राज्य सरकारच्या निवडणुका नंतर सरपंच पदाचे आरक्षण काढत या आदेशाची पायमल्ली झाली असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणूक पूर्व सरपंच पदाचे काढलेले आरक्षण राज्य सरकारने रद्द करून निवडणूका झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्याचे आदेश दिल्याने यानुसार राज्यात निवडणुकीपूर्वी काढलेले आरक्षण रद्द करून नव्याने सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे.
या ग्रामपंचायतीच्या निवडणूका अद्याप बाकी :पैठण तालुक्यातील आपेगाव ,खेर्डा, शेवता, तांडा बु, खादगाव, बीडकीन, शेकटा तारू पिंपळवाडी, मुधलवाडी, नारायणगाव, हिरापूर, धुपखेडा, जांभळी, बोकूड जळगाव, टाकळी पैठण, देवगाव, कृष्णापूर, गेवराई बाशी, पोरगाव, आडूळ, सालवडगाव, चिंचाळा, नांदर, धनगाव, वरवंडी खु, दिन्नापूर, वडवाळी, कुरणपिंप्री या ग्रामपंचायतीच्या निवडणूका दुसऱ्या टप्प्यात होणार असून यासाठी दोन वर्षाचा कालावधी अद्याप शिल्लक आहे. परंतु, शनिवारी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे.