संतोष हिरेमठ ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील डोंगराळ भागातील पिशोर ग्रामीण रुग्णालय... ५० गावांतील रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून... मात्र, रुग्णालयात विविध आजारांवरील औषधी नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसून ती खाजगी मेडिकलमधून घेण्याची वेळ गोरगरीब रुग्णांवर येत आहे. ही परिस्थिती केवळ एकट्या पिशोरमधील रुग्णालयाची नाही. एकीकडे लाखो रुपयांची औषधी वर्षानुवर्षे पडून कालबाह्य होत आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांची फरपट होत आहे.लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. औषधी कालबाह्य होईपर्यंत आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचा धक्कादायक प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांत औषधींचा पुरेशा पुरवठा होत नाही. अपुºया औषधींच्या जोरावरच रुग्णसेवा देण्याची वेळ येत आहे. औषधांची वारंवार मागणी करूनही आरोग्य विभागाकडून पुरवठा केला जात नाही.औषधींअभावी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी, खाजगी मेडिकलमधून औषधी घेण्याची वेळ ग्रामीण भागातील रुग्णांवर येत आहे. औषधीपुरवठ्याकडे दुर्लक्ष करून खाजगी मेडिकलचे भले करण्याचा डाव साधला जात असल्याचा आरोप गोरगरिबांकडून होत आहे. एकीकडे ही परिस्थिती, तर दुसरीकडे साठ्यातील औषधींच्या मुदतीकडे दुर्लक्ष करून ती निरुपयोगी करण्याचा गंभीर प्रकार होत आहे. याविषयी संताप आहे.चार महिन्यांपासून तुटवडापिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या चार महिन्यांपासून अनेक प्रकारच्या औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी दुकानातून औषधी आणाव्या लागत आहेत. डोंगराळ भाग असल्याने येथे सर्पदंशाच्या घटना जास्त घडतात. सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे रुग्णांची संख्याही वाढली आहे; परंतु काहीच औषधी रुग्णालयात मिळतात, तर इतर औषधी खाजगी मेडिकलमधून आणाव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे महिन्याकाठी कुटुंब नियोजनाच्या २० शस्त्रक्रिया रुग्णालयात होतात. मात्र, यासाठीसुद्धा पुरेसा औषधीसाठा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही. दर महिन्याला रुग्णालयामार्फत आॅनलाइन मागणी केली जाते. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने रुग्णांना बाहेरून औषधी आणाव्या लागतात, असे प्रभारी अधीक्षक डॉ. धीरज पाटील यांनी सांगितले.
औषधी तुटवड्याने रुग्णांची फरपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:33 AM