छत्रपती संभाजीनगर : जलजीवन मिशनची सर्व कामे डिसेंबरअखेरपर्यंत करण्याची शासनाने डेडलाइन दिली आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील १२५ कामे सुरूच झालेली नाहीत. यासंदर्भात नाराज झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना हे आता ॲक्शन मोडवर आले असून, कामात अडथळा आणणाऱ्या औरंगाबाद तालुक्यातील दोन सरपंचांविरुद्ध बडतर्फीचा प्रस्ताव तयार केला आहे. दुसरीकडे, ९९ कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही त्यांनी अजून कामे सुरू केलेली नसून त्यांच्यावरही कारवाईचे करण्याचा इशारा दिला आहे.
डिसेंबरअखेरपर्यंत जलजीवन मिशनची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची लगबग सुरू आहे. या मिशनअंतर्गत जिल्ह्यातील १२९७ गावांमध्ये ११६१ कामे सुरू आहेत. सध्या यापैकी ४८८ गावांतील कामे पूर्णत्वाकडे आलेली असून, ११० गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
उर्वरित कामांसाठी कधी पाटबंधारे विभागाकडून, तर कधी गावकारभाऱ्यांकडूनच अडचणी येत आहेत. यासंदर्भात सीईओ विकास मीना तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे यांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना बोलून, शासन स्तरावर पत्रव्यवहार करून तलाव क्षेत्रात विहीर खोदण्याबद्दल आणला जाणारा अडथळा दूर केला. तरीही अजून काही ठिकाणी ही अडचण सुरूच आहे.
सीईओ मीना यांनी अलीकडेच रखडलेल्या कामांचा आढावा घेतला. तेव्हा प्रामुख्याने १२५ कामे अजूनही सुरूच झालेली नसल्याची माहिती समोर आली. तेव्हा संबंधित ९९ कंत्राटदार व २६ सरपंच, ग्रामसेवकांची सुनावणी घेतली. लोकांना पाणी देण्याची ही योजना असून, शासनाच्या योजनेच्या कामांत अडथळा आणणे हा गुन्हा असल्याचे त्यांना समजावून सांगितले. येत्या सात दिवसांपर्यंत रखडलेली १२५ कामे सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. जर सात दिवसांत कामे सुरू झाली नाहीत, तर संबंधित कंत्राटदारांकडून कामे काढून घेतली जातील व त्यांना ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकले जाईल. दुसरीकडे, जे सरपंच कामांमध्ये अडथळा आणतील, त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करून त्यांना बडतर्फ केले जाईल, असा इशारा दिला आहे.
रखडलेली कामेतालुका- कंत्राटार- ग्रामपंचात स्तरऔरंगाबाद- ५- २८फुलंब्री- २- ८सिल्लोड- १- ८सोयगाव- ०- ४कन्नड- ३- १९खुलताबाद- ०- १५गंगापूर- ८- ७वैजापूर- १-०पैठण- ६- १०