---
औरंगाबाद : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या संचालक मंडळाला हटवून तिथे प्रशासक म्हणून उपनिबंधक कार्यालयातील लिपिक यशवंत देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पतसंस्थेची निवडणूक सहा महिन्यांत घेण्याचे निर्देश तालुका उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी दिले आहेत. दरम्यान, वेळोवेळी केलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा शिक्षक समन्वय समितीने केला आहे.
औरंगाबाद तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या कार्यकारी संचालक मंडळाने इमारतीच्या कामासह, कोरोना काळात प्रवास भत्ता, मीटिंग भत्ता उचलणे, फर्निचर, आदी कामांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करून अनियमितता केली होती. यासंदर्भात तालुका, जिल्हा, विभागीय सहनिबंधक तसेच प्राधिकरण आयुक्त व सहकार आयुक्त (पुणे) यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. कारवाईसाठी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर चार वेळा आंदोलने करून दोषी संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने शिक्षक समन्वय समितीने केली होती. दोषी संचालक मंडळावर कारवाई व्हावी म्हणून सभासद समन्वय समितीचे बाबूराव गाडेकर, बाजीराव ताठे, श्रीराम बोचरे, ज्ञानेश्वर पठाडे, रणजित राठोड, मनोज चव्हाण, कैलास गायकवाड, विजय साळकर, दिलीप ढाकणे, प्रकाश साळवे, संजीव बोचरे, दिलीप गोरे, आदींनी पुणे येथे आंदोलन करून सहकार आयुक्त यांचे लक्ष वेधले होते.
दरम्यान, गुरुवारी उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी देवकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करीत सहा महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.