बाजारसावंगी : पाडळी येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या दोन वर्षांपासून कुलूपबंद आहे. यामुळे या केंद्रांतर्गत येणाऱ्या पाडळी, दरेगाव, झरी, वडगाव या गावांतील नागरिकांना आरोग्य सुविधांसाठी खाजगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांचे दरेगाव हे गाव या उपकेंद्रांतर्गत येते. त्यांचेही इकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाडळी येथील उपकेंद्राचे काम चालते. याअंतर्गत येणाऱ्या चार गावांना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी असताना, हे उपकेंद्र गेल्या दोन वर्षांपासून कुलूपबंद आहे. पाडळीची लोकसंख्या ३ हजार, दरेगावची ४ हजार, झरी २ हजार, तर वडगाव १ हजार एवढी लोकसंख्या असतानाही उपकेंद्र बंद असल्याने नाइलाजाने नागरिकांना आरोग्य सेवेसाठी बाजार सावंगी, कन्नड किंवा फुलंब्री येथील खाजगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागतो. या उपकेंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी पाडळी येथील अरुण आघाडे यांच्यासह चारही गावांतील नागरिकांनी बाजारसावंगी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
चौकट
दिव्याखाली अंधार
आरोग्य उपकेंद्र हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत चालते. पाडळी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या दरेगाव येथील रहिवासी असलेले एल. जी. गायकवाड हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत. हा परिसर त्यांचा मतदारसंघ असूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने दिव्याखाली अंधार अशी गत या भागातील नागरिकांची झाली आहे.
काेट
लवकरच कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल
सध्या उपकेंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे काम जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच आरोग्य उपकेंद्र सुरू होईल.
एल. जी. गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष
फोटो : गेल्या दोन वर्षांपासूून कुलूपबंद असलेले पाडळी येथील आरोग्य उपकेंद्र.