वाळूज महानगर : पंढरपूर-वाळूज रस्ता दुभाजकावरील संरक्षक लोखंडी जाळ्यांची दुरावस्था झाले असून, ठिकठिकाणी या जाळ्या तुटल्या आहेत. त्यामुळे नागरिक व लहानमुले जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
जागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने नगर-औरंगाबाद या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर या महामार्गावरील पंढरपूर-वाळूज गावातील दुभाजकावर संरक्षक लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या. आजघडीला दुभाजकावरील लोखंडी जाळ्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत. काही नागरिकांनी ये-जा करण्यासाठी लांबची पायपीट होत असल्यामुळे या जाळ्या तोडल्याची चर्चा आहे.
रस्ता दुभाजकावरील जाळ्या तुटल्यामुळे या दोन्ही गावातील नागरिक, लहान मुले जिव धोक्यात घालुन दुभाजकावरुन ये-जा करीत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या दुभाजकांची दुरुस्ती करुन रंग-रंगोटीची केलेली आहे. मात्र्न, तुटलेल्या लोखंडी जाळ्या बसविण्यात न आल्यामुळे नागरिकात नाराजीचा सूर उमटत आहे. या दुभाजकावरील लोखंडी जाळ्यांची डागडुजी करण्यात यावी किंवा नवीन जाळ्या बसविण्याची मागणी नागरिकातून होत आहे.