वाळूज महानगर : काही दिवसांपासून सिडको वाळूज महानगरातील नागरी वसाहतीला दूषित पाणीपुरवठा होत आहे. दुर्गंधीयुक्त व दूषित पाण्यामुळे या वसाहतीतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिडको प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी रहिवाशांतून होत आहे.
सिडको वाळूज महानगरातील वसाहतीला प्रशासनाकडून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. सिडकोकडे जलशुद्धीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. एमआयडीसीकडून मिळणारे पाणीही अशुद्ध येत आहे. शिवाय पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. त्यामुळे घाण पाणी जलवाहिनीत मिसळत असून, ते या रहिवाशांना पुरविले जात आहे. साक्षीनगरी, स्वामी समर्थ, साई सहवास, राजर्षी शाहुनगर, सारा गौरव, साई रेजेन्सी आदी भागांत मंगळवारी दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणी पुरवठा झाला. चार दिवसांतून एकदा मिळणारे पाणीही दूषित असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. नागरी आरोग्याचा प्रश्न लक्षात घेवून प्रशासनाने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांतून केली जात आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका ..सिडकोत पाणीटंचाई सुरु असून, चार ते पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. तेही दुषित असल्याने जुलाब, पोटदुखी, मळमळ, गॅस्ट्रो, अंगाला खाज येणे आदी साथीचे आजार बळावत आहेत. साथरोगामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.