वाळूज महानगर: गत आठवडाभरापासून जोगेश्वरी मूळ गावासह नवीन वसाहतीत नळाद्वारे दूषित पाणी येत आहे.या पाण्यमुळे साथरोगाची लागण होत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत एमआयडीसीकडून विकतचे पाणी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरीसह कमळापूर, रामराई, नायगाव-बकवालनगर या भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करते. मात्र, एमआयडीसीने पाणी कपात केल्याने गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आठवडाभरापासून मूळ गावासह नवीन नागरी वसाहतीला दूषित पाणीपुरवठा होत आहे.
या भागात बहुतांश कामगार वास्तव्यास आहे. या भागात नळाद्वारे माती मिश्रित पिवळसर रंगाचे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. हे पाणी पिल्याने कावीळ, जुलाब, पोटदुखी तसेच त्वचेच्या आजाराची लागण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याविषयी नागरिकांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता एमआयडीसीकडूनच दूषित पाणी येत असल्याचे सांगितले जाते.
या विषयी एमआयडीसीचे अभियंता प्रशांत सरग म्हणाले की, धरणातील पाणीपातळी कमी झाल्याने मृत साठ्यातून पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे कदाचित दूषित पाणी येत असावे. याविषयी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देवून त्यांच्याशी चर्चा केली आहे.