औरंगाबाद : जानेवारी महिन्यात सुरू झालेली शिवभोजन योजना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आधार ठरली. शहरात चारच केंद्रांत सुरू झालेली ही योजना आता जिल्ह्यात १८ ठिकाणांहून पाच रुपयांत शिवभोजन थाळी देत आहे. जुलैअखेर ३ लाख ३२ हजार ३१३ थाळ्यांचे वाटप करण्यात आले. केंद्रांना ठरवून दिलेल्या थाळ्यांचे वाटप झाले नाही तर मोफत वाटप करून कोटा पूर्ण केला जात असल्याचे गुरुवारी दिसून आले. लाभधारकांनी जेवण चांगले मिळत असल्याचे प्रशस्तीपत्र देतानाच भाजीपोळी वाढवण्याची गरज व्यक्त केली.
लोकमत प्रतिनिधीने बसस्थानक, टीव्ही सेंटर, घाटी रुग्णालयातील शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यात एकूण १८ केंद्र आहेत. त्यापैकी सहा केंद्र शहरात असून १२ केंद्र ग्रामीण भागात आहेत. त्यांना एकूण ३ हजार थाळ्या वाटपाची परवानगी मिळालेली आहे. कोरोनामुळे थाळीऐवजी पॅकिंग फूड दिले जाते. थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण व भात देण्यात येत असल्याचे घाटीतील केंद्रचालक राजू भैरव यांनी सांगितले. तर लॉकडाऊन काळातही ठरवून दिलेल्या थाळ्यांचे वितरण रोज पूर्ण केल्याचे बसस्थानक येथील केंद्रचालक उपिंदर मल्होत्रा म्हणाले.
१७ केंद्रांतून २३४५ पाकिटांचे वाटपया योजनेतून थाळीचा लाभ घेण्यासाठी अॅपद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याची आकडेवारी थेट अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वितरण प्रणालीवर कळते. गुरुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत २३४५ थाळ्यांचे वाटप झालेले होते, तर १८ पैकी शहरातील शिवाजीनगर येथील केंद्रावर एकही थाळी वाटप करण्यात आलेली नव्हती. केंद्रचालकांना मंजूर थाळ्यांचे अन्न पाकीट तयार होते. ठरवून दिलेल्या वेळेत ही पाकिटे वाटप न झाल्यास मोफतही वाटप करण्यात आल्याचे दिसून आले.
शिवभोजन थाळ्यांच्या वाटपाची आकडेवारी
महिना : थाळ्यांचे वाटपजानेवारी : २,७९०फेब्रुवारी : १४,६२९मार्च : १९,८९३एप्रिल : ६७,०१७मे : ७०,९८८जून : ७८,४९४जुलै : ७८,५०२एकूण : ३,३२,३१३
नातेवाईक नव्हते तरी अडचण आली नाहीगेल्या आठ दिवसांपासून घाटीत पत्नी भरती आहे. इथे कोणी नातेवाईक नाही; परंतु शिवभोजनामुळे इथे जेवणाची अडचण आली नाही. वरण-भातासोबत रोज वेगळी भाजी असते.- गंगाधर दुतोंडे, भोकरदन
पैसे नसले तरी मोफत भोजनमला कोणीच नसल्याने मी दोन महिन्यांपासून घाटीच्या नातेवाईकांच्या निवाऱ्यात राहते. माझ्याकडे पैसे नाहीत; परंतु मोफत शिवभोजन मिळते. चांगले व पोटभर जेवण होते. -शेख नसीम, बीड
भाजी व पोळी वाढविली पाहिजेबसस्थानकाजवळ एका इमारतीवर काम करतो. दुपारचे जेवण मी बसस्थानकातील शिवभोजन केंद्रावरून पाकीट घेऊन करतो. पोळी आणि भाजी वाढवून दिली पाहिजे; पण किंमत वाढवू नये.- सुरेश जाधव, सिडको