वाळूज महानगर : वाळूजमहानगरातील २० अंगणवाड्यांना मंगळवारी (दि.१०) जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
बजाजविहार येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, संस्थेच्या समन्वयक सुनिता पगारे, अंगणवाडी पर्यवेक्षिका छाया सोनकांबळे उपस्थित होत्या.
मिरकले म्हणाले की, बाल संगोपण, कुपोषण, गरोदर मातांची आरोग्य तपासणी, सकस आहार, लहान मुलांचे आरोग्य, कुपोषण मुक्ती आदीं कामात अंगणवाडी सेविकाचे योगदान महत्वाचे आहे. शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम अंगणवाडी कार्यकर्त्या व सेविका बजावत असतात. सुनिता पगारे म्हणाल्या की, नागरी विकास प्रकल्पाअंतर्गत पंढरपूर व वडगाव परिसरातील २९ अंगणवाड्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत जवळपास ८ हजार कुटुंबाना लाभ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात बालकांच्या मानसिक , शारिरीक व बौध्यीक विकासासाठी परिसरातील २० अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला ऐश्वर्या मोहिते, वैशाली शिंदे, वैशाली थोरात आदीसह अंगणवाडी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.