औरंगाबाद : सन २०१५ व २०१७ मधील गुणवंत कामगार व कामगार भूषण पुरस्काराने १०६ कामगारांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. कोरोनामुळे या पुरस्कारांचे वितरण रखडले होते.
कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे मुंबईत वितरण झाले. या १०६पैकी १०४ जणांना ‘गुणवंत कामगार’ तर दोघांना ‘कामगार भूषण’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. यातील महेश सेवलीकर हे औरंगाबाद येथील बजाज ऑटोचे कामगार आहेत. त्यांना २०१५ साली हा पुरस्कार जाहीर झाला होता. रोख ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
२०१५मधील ५१ व २०१७मधील ५३ अशा एकूण १०४ कामगारांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख २५ हजार रुपये, स्मतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महेश सेवलीकर यांच्यासह औरंगाबादचे सुखदेव सूर्यवंशी, जितेंद्र कुलकर्णी, अलका कर्णिक, दिलीप आसबे, अंबादास देवराये, सतीश देशपांडे, नीळकंठ राठोड, शेख अब्दुल शेख सलीम, श्रीकांत मोरे, उल्हास देशमुख, शरद शिरस, शेख सलीमोद्दीन, किसन शिर्लेकर या कामगारांना सन्मानित करण्यात आले.