छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मंडळाने या विद्यार्थ्यांनी जेवढी उत्तरे लिहिली होती. त्या उत्तरानुसार निकाल जाहीर करीत गुणपत्रिकांचे वितरण थांबविण्यात आले होते. मात्र, पोलिसांना अद्याप आरोपी शिक्षक सापडले नाहीत. त्यातच संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने ३७२ गुणपत्रिकांचे वाटप केल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली.
शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचा तपासणीचा प्रवास केंद्रप्रमुख, कस्टोडियन, मॉडरेटर, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य ते शिक्षक असा होता. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने परत मंडळात येतात. यावर्षी बारावीच्या परीक्षेला १ लाख ७५ हजारहून अधिक विद्यार्थी बसले होते. बीड, अंंबाजोगाई, कान्होळा, पैठण या ठिकाणच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घनवट आणि पिंपळा येथील शिक्षक राहुल भंगवान ऊसारे आणि मनिषा भागवत शिंदे यांच्याकडे पाठविल्या होत्या. १३ मार्च रोजी उत्तरपत्रिका तपासून जमा करणे अपेक्षित असतांना वारंवार मंडळाने सांगूनही ८ एप्रिल रोजी त्या जमा करण्यात आल्या. तेव्हा मॉडरेटरने तपासणी केल्यानंतर त्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शिक्षकांवर फर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात मंडळाने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरांची तपासणी करून त्यांचा निकाल जाहीर केला होता. मात्र, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नव्हत्या. त्या गुणपत्रिका मागील दोन दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
शिक्षण मंडळाने केले हात वरमंडळाने गुणपत्रिका संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठविलेल्या नव्हत्या. त्यामुळे महाविद्यालयांनी त्याचे वितरण विद्यार्थ्यांना केले नव्हते. मात्र निकालास २४ दिवस उलटून गेले आहेत. विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील निकाल रखडल्यामुळे मंडळाचे गुणपत्रिका महाविद्यालयात पाठवून दिल्या. त्याचे वाटप मागील दोन दिवसात झाले आहे. याविषयी मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना विचारले असता, त्यांनी मंडळाकडे गुणपत्रिकाच नव्हत्या. निकाल लागला तेव्हाच सर्वासोबतच त्या गुणपत्रिका संबंधितांच्या शाळांमध्ये पाठविल्याचे सांगितले. त्यामुळे या गुणपत्रिका नेमक्या कुणी आणि कुठे आडवून ठेवल्या होत्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.