वाळूज महानगर : पंढरपुरातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन व्यवसायिक वापर केली जात असलेली दुकाने सील करण्याचे आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. सदरील अतिक्रमण २४ तासांत काढण्याच्या अल्टिमेटममुळे व्यवसायिकांत खळबळ उडाली असून, तहसीलदारांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीच्या वतीने २६१ दुकानदारांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
येथील शासकीय गायरान जमिनीवरील निवासी व व्यवसायिक अतिक्रमणे तात्काळ निष्काषीत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासनास अतिक्रमणे निष्कासित करण्यास सांगितले. तहसीलदार रमेश मुनलोड यांनी तीन दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये भेट देऊन अतिक्रमणाचा आढावा घेतला होता. या कारवाईमुळे धास्तावलेल्या व्यवसायिक व नागरिकांची शनिवारी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात बैठक घेण्यात आली. या अतिक्रमणासंदर्भात कायदेशिर लढा देण्यासाठी कृती समितीने तयारी सुरु केली आहे. यासाठी अतिक्रमणधारकांनी भुखंडाचे खरेदीखत, ग्रामपंचायतीच्या दफ्तरी असलेल्या नोंदी, कर भरल्याच्या पावत्या, ना हरकत प्रमाणपत्रे आदीची पूर्तता करण्याचे काम सुरु आहे. अतिक्रमणे निष्कासित करण्यात येऊ नये, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णयही कृती समितीच्या वतीने घेण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे यांच्या दालनात सोमवारी नायब तहसीलदार रतनसिंग साळोख, सरपंच शेख अख्तर, ग्रामसेवक नारायण रावते, मंडळ अधिकारी के.एल.गाडेकर, तलाठी पुनमसिंग राजपूत आदींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यात २६१ व्यवसायिकांना नोटिसा बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संबंधित अतिक्रमणधारकांना २४ तासांत अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्याचे सांगण्यात आले आहे. अन्यथा अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात काढण्याचा इशाराही देण्यात आला असल्याचे ग्रामसेवक रावते यांनी सांगितले.