औरंगाबाद : राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियम जाहीर केले आहेत. कोरोना काळात मागील वर्षीप्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी चार फुटापेक्षा मोठी मूर्ती नसावी, असे म्हटले आहे. मात्र, यावर शहरातील नामांकित सार्वजनिक गणेश मंडळांनी आक्षेप घेतला आहे.
शहरात मागील १० दशकांपेक्षा अधिक काळापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांच्या पारंपरिक गणेशमूर्ती मोठ्या आकारातील आहेत. साधारणत: ६ ते १५ फुटापर्यंतच्या या मूर्ती आहेत. त्या मूर्तीला त्यांनी सोन्या-चांदीचे अलंकार तयार केले आहेत. अशा मंडळांना पारंपरिक मूर्ती बसविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पुढे आली आहे.
शहागंजातील नवसार्वजनिक गणेश मंडळ, धावणी मोहल्ल्यातील बाल कन्हैया गणेश मंडळ, राजाबाजार रस्त्यावरील देवडीचा राजा गणेश मंडळ, जाधवमंडी, बांबू गल्ली रस्त्यावरील अष्टविनायक गणेश मंडळाचा लालबागचा राजा, नागेश्वरवाडी येथील महाकाल प्रतिष्ठान, हडकोचा राजा, जवाहरचा राजा आदी सार्वजनिक गणेश मंडळे आहेत, जी मोठी पारंपरिक मूर्ती बसवितात. यातील काही गणेशमूर्ती फायबरच्या आहेत व दरवर्षी एकच मूर्ती बसविली जाते. काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, आम्हाला आमची पारंपरिक गणेशमूर्ती बसविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
चौकट
शहरात मागील ४० वर्षांपासून आम्ही पारंपरिक गणेशमूर्ती बसवत आहोत. त्यात आम्ही कोणताच बदल केला नाही. त्या मूर्तीचे सोन्या-चांदीचे अलंकार तयार केले आहेत. जिल्हा प्रशासनाने अशा पारंपरिक मूर्ती बसविण्यास परवानगी द्यावी.
- लक्ष्मीनारायण राठी
कार्यकारिणी प्रमुख, नवसार्वजनिक गणेश मंडळ, गांधी पुतळा चौक.
---
आमची इकोफ्रेंडली मूर्ती
बालकन्हैया गणेश मंडळाची ११ फूट उंचीची इकोफ्रेंडली गणेशमूर्ती आहे. दरवर्षी त्याच मूर्तीची गणेशोत्सवात आम्ही प्रतिष्ठापना करतो. या पारंपरिक गणेशमूर्तीला सरकारने परवानगी द्यावी.
- धीरज सिद्ध
संस्थापक-अध्यक्ष, बालकन्हैया गणेश मंडळ, धावणी मोहल्ला.
---
जिल्हा प्रशासन, गणेश मंडळांच्या बैठकीत घेऊ निर्णय
मागीलवर्षीप्रमाणे यंदाही सरकारने गणेशोत्सवावर निर्बंध जाहीर केले आहेत. यंदाही सर्व नियम पाळून गणेशोत्सवात आरोग्योत्सव साजरा केला जाईल. पारंपरिक गणेशमूर्तीच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, जिल्हा शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची लवकरच बैठक घेऊन सर्वानुमते त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.
- पृथ्वीराज पवार
संस्थापक-अध्यक्ष, सर्वपक्षीय जिल्हा शिवजयंती उत्सव समिती.
कॅप्शन
मूर्तिकारांना वेध गणेशोत्सवाचे...
गणेशोत्सवाच्या आधी सहा महिन्यांपासून मूर्तिकारांना गणेशोत्सवाचे वेध लागतात. मूर्तिकारांनी यंदाही ४ फुटापेक्षा मोठ्या मूर्ती बनविणे टाळले असून घरगुती मूर्ती तयार करण्यावरच भर दिला आहे.
कॅप्शन -
शाडूच्या गणपतीला फिनिशिंग करताना मूर्तिकार वर्षा छत्रे.
----