औरंगाबाद- दोन दिवसांत ९३ गावांत बाधित रुग्ण आढळून आल्याने सुरुवातीला शहरी भागालगत असलेला संसर्ग आता गावातही पोहोचतो आहे. त्यामुळे आतापर्यंत बाधित सुमारे २०० गावांत सुपरस्प्रेडरचा शोध, संपर्कातील लोकांचा शोध, तपासणी आणि लसीकरणावर फोकस करण्याच्या सूचना ग्रामीण आरोग्य यंत्रणेला मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी दिल्या आहेत.
ग्रामीण भागात गुरुवारी २२३ रुग्ण बाधित आढळून आल्याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, तपासणीचे गेल्या दोन ते तीन दिवसांतील अहवाल एकत्र आल्याने आकडा वाढलेला दिसत असून, तशी परिस्थिती नाही. त्यामुळे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विषाणू तपासणी प्रयोगशाळेने जिल्ह्याच्या स्वॅब तपासणीला प्राथमिकता देण्याच्या सूचना त्यांनी प्रयोगशाळेचे प्रमुख डाॅ. खेडकर यांना दिल्या. खेडकर यांनी यंत्राच्या व प्रयोगशाळेच्या अडचणी सांगताना नाशिक आणि परभणी येथील स्वॅबमुळे तपासणी अहवालाला उशीर झाला. आता सातशे ते आठशे स्वॅबची रोज तपासणी होईल. तर नवे ॲटोमेटेड यंत्र मिळाल्यावर दोन ते अडीच हजार दररोज तपासणी करता येईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मदत मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट करत जिल्ह्याच्या स्वॅब तपासणीला प्राथमिकता दिली जाईल, असे सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके, डाॅ. उल्हास गंडाळ, डाॅ. विजयकुमार वाघ यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांत लसीकरणजिल्ह्यात लसीकरण वाढविण्यासाठी सोमवारपासून आठवड्यातून तीन दिवस लसीकरणाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सोमवार, बुधवारी, शुक्रवारी हे लसीकरण होईल. त्यासाठी ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी, ग्रामसेवकांना गावकऱ्यांना ठरावीक दिवशी लसीकरणाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.
११ कोविड केअर सेंटर सुरूजिल्ह्यात ५८ कोविड केअर सेंटर सुरू करण्याची यापूर्वीही तयारी करून ठेवण्यात आली होती. सध्या रुग्ण वाढताहेत. त्या दृष्टीने तालुकानिहाय प्रत्येकी एक तर वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असल्याने इथे प्रत्येकी दोन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून आवश्यकतेनुसार तयारी सुरू आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन काॅन्संट्रेटर तर उपकेंद्रात ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली असून ११ केंद्रांत ९६२ खाटांची व्यवस्था असून त्यापैकी ८० टक्के खाटा रिक्त आहेत.
मनुष्यबळ वाढवतोयसध्या मनुष्यबळ पुरेसे आहे. रुग्ण वाढत असल्याने आरबीएसके योजनेचे मनुष्यबळ, फार्मासिस्ट, एएनएम यांची मदत घेतली जात असून आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या असल्याचे गोंदावले यांनी सांगितले.