लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात रमाई आवास योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागामध्ये ९ हजार ९१९ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ शासनाने लाभार्थ्यांना दिवाळीची भेटच दिली असून, घरकूल बांधकामांना गती येणार आहे़शासनाच्या वतीने पंतप्रधान घरकूल योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना राबविली जाते़ यातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी हे २०११ च्या जनगणनेप्रमाणे प्राधान्यक्रम यादीतून निवडले जातात़ परंतु, या यादीबाहेरही बहुतांश लाभार्थ्यांना स्वत:ची पक्के घरे उपलब्ध नाहीत़ अशा अनुसूचित जातीमधील लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल देण्याचा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे़ यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी परभणी जिल्ह्याला ९ हजार ९१९ घरकुले बांधकामाचे उद्दिष्ट दिले आहे़ जिल्हा प्रशासनाने शहरी व ग्रामीण भागासाठी उद्दिष्ट निश्चित करून प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला होता़ या प्रस्तावास शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे़ त्यानुसार शहरी भागासाठी २ हजार ९१९ तर ग्रामीण भागासाठी ७ हजार घरकुले उभारली जाणार आहेत़ जिल्हा घरकूल निर्माण समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील तालुक्यांना उद्दिष्ट वितरित केले जाणार आहे़ जिल्हा घरकूल निर्माण समितीने यंत्रणेमार्फत अर्ज प्राप्त करून घेऊन अर्जांची छाननी केली जाणार असून, यातून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे़पात्र लाभार्थ्यांचे अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून मंजूर केल्यानंतर ही माहिती राज्य व्यवस्थापन कक्ष व आयुक्तालयांना सादर करावी लागणार आहे़ त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील लाभार्थी निवडीसाठी कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत़ सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागामार्फत लाभार्थ्यांच्या निवडीबाबत कार्यवाही केली जाणार आहे़
१० हजार घरकुलांचे जिल्ह्याला उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:31 AM