गतवर्षी जूनमध्येच जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. कल्याण काळे आणि शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी हिशाम उस्मानी यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीला आता एक वर्ष होत आले तरी दोघांची नवीन कार्यकारिणी अस्तित्वात आलेली नाही. बाळासाहेब थोरात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना डॉ. काळे व उस्मानी यांची नियुक्ती झाली होती. पुढे ते बदलले. त्यांच्या जागी नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी आले. कोरोनामुळेही कार्यकारिणी मंजुरीचा विषय लांबणीवर पडत आहे.
जिल्ह्याची कार्यकारिणी तयार करून मी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे व विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवलेली आहे. मागील कार्यकारिणीतील सर्वांची पदे अशीच ठेवण्यात आलेली आहे. ते त्यांच्या पदावर काम करीत आहेत. काम थांबलेले नाही असे यासंदर्भात डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले.
उस्मानी म्हणाले की, शहर काँग्रेसची ५० जणांची कार्यकारिणी मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवली आहे. मागील कार्यकारिणीतील पदे तशीच ठेवण्यात आलेली आहेत. आमचे काम चालू आहे.
नवीन अध्यक्ष निवडल्यानंतर त्याला त्याच्या पद्धतीने पदाधिकारी नेमण्याचे स्वातंत्र्य असते. औरंगाबादच्या दोन्ही अध्यक्षांना या स्वातंत्र्याचा अद्याप लाभ मिळालेला नाही असेच म्हणावे लागेल. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एकही खासदार नाही. एकही आमदार नाही. या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी टीम उभी करण्यासाठी प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. नाना पटोले हे एक डॅशिंग अध्यक्ष म्हणून काम करीत असून त्यांच्याकडून लवकरात लवकर जिल्ह्याची व शहराची कार्यकारिणी मंजूर होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.