शेतकी मतदार संघाच्या औरंगाबाद तालुक्यातून ३९ मते घेऊन शेतकरी विकास पॅनलचे जावेद पटेल हे विजयी झाले, तर शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे अंकुश शेळके हे पराभूत झाले. त्यांना ३३ मते मिळाली. खुलताबाद मतदारसंघातून किरण पाटील डोणगावकर हे बिनविरोध निवडून आले. शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे असून, विद्यमान संचालक आहेत.
फुलंब्री तालुक्यातून शेतकरी विकास पॅनलचे सुहास शिरसाट यांना ३६ मते मिळून ते विजयी झाले, तर शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे विद्यमान संचालक पुंडलिक जंगले हे २५ मते घेऊन पराभूत झाले. सिल्लोड तालुक्यातून शेतकरी विकास पॅनलचे अर्जुनराव गाढे हे ६३ मते घेऊन विजयी झाले, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे विष्णू जांभूळकर यांना १९ मते पडली.
सोयगाव तालुक्यातून शेतकरी सहकारी बँक विकास पॅनलचे उमेदवार व विद्यमान संचालक रंगनाथ काळे पराभूत झाले. त्यांना १२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी विकास पॅनलच्या सुरेखा प्रभाकर काळे या २२ मते घेऊन विजयी झाल्या. कन्नड तालुक्यातून शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे उमेदवार व विद्यमान संचालक अशोक मगर हे पराभूत झाले. त्यांना ३९ मते मिळाली, तर शेतकरी विकास पॅनलचे मनोज राठोड हे ६० मते मिळून विजयी झाले. पैठणमधून राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. ते शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते आहेत.
गंगापूर तालुक्यातून शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे कृष्णा पाटील डोणगावकर हे ५५ मते घेऊन विजयी झाले. येथे शेतकरी विकास पॅनलने जयराम साळुंके यांना पाठिंबा दिला होता व गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी त्यांना ताकद दिली होती. साळुंके यांना ४२ मते मिळाली. वैजापूरहून आप्पासाहेब पाटील यांनी आपले वडील रामकृष्ण बाबा पाटील यांची जागा राखण्यात यश मिळविले. त्यांनी शेतकरी सहकार बँक पॅनलचे ज्ञानेश्वर जगताप यांचा पराभव केला. जगताप यांना ४४ मते मिळाली.
बिगर शेती मतदार संघाच्या ५ जागांसाठी प्रतिष्ठेची व चुरशीची निवडणूक झाली. याच मतदारसंघातून विद्यमान संचालक, आमदार हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला. त्यांना १२३ मते मिळाली.
या मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलचे नितीन पाटील यांना १७६, तर शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे जगन्नाथ काळे यांना १७६ मते मिळाली. या मतदारसंघातून शेतकरी विकास पॅनलचे आमदार अंबादास दानवे हे १६० मते घेऊन, तर याच पॅनलचे आमदार सतीश चव्हाण १५१ मते घेऊन विजयी झाले.
अभिषेक जैस्वाल यांना १४७ मते मिळाली व ते विजयी झाले. ते कोणत्याच पॅनेलमध्ये नव्हते.
या मतदार संघात रवींद्र काळे (११८), एकनाथ जाधव (१३६), अभिजीत देशमुख (१३३), दिलीप बनकर (६७) हे पराभूत झाले. अनिल अंबादास मानकापे यांना अवघी १७ मते मिळाली व ते पराभूत झाले.
कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना ३३ मते मिळाली व ते विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे प्रकाशचंद्र मुथा यांना अवघी ७ मते मिळाली. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली होती.
महिला राखीव मतदार संघाच्या २ जागांसाठी ५७३ मते घेऊन विद्यमान संचालक व शेतकरी विकास पॅनलच्या मंदा अण्णासाहेब माने या विजयी झाल्या. तर याच मतदारसंघातून शेतकरी सहकार बँक विकास पॅनलच्या पार्वताबाई रामहरी जाधव या ४९८ मते घेऊन विजयी झाल्या. शेतकरी विकास पॅनलच्या मंगल वाहेगावकर यांना ४६७ मते मिळाली. त्या पराभूत झाल्या.
अनुसूचित जाती मतदार संघातून एका जागेसाठी विद्यमान संचालक दशरथ गायकवाड यांचे पुत्र डॉ. सतीश गायकवाड हे विजयी झाले. त्यांना ५९८ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी सहकार बँक विकास पॅनलचे डॉ. पवन डोंगरे यांना ३९८ मते मिळाली. ते पराभूत झाले.
ओबीसी मतदार संघाच्या एका जागेसाठी देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर व विद्यमान संचालक अंकुश रंधे यांच्यात चुरशीची निवडणूक झाली. देवयानी डोणगावकर यांना ५३६ मते मिळून त्या विजयी झाल्या. रंधे यांना ४८५ मते मिळाली.
व्हीजेएनटी मतदार संघाच्या एका जागेसाठी दिनेशसिंग परदेशी व शाहनवाज खान यांच्यात निवडणूक झाली. परदेशी यांना ७०६ मते मिळून ते विजयी झाले. शाहनवाज खान यांना ३०८ मते मिळाली.