वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील सागर गॅस सर्व्हिसेस या ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पथकासमवेत शनिवारी (दि.२४) सकाळी पाहणी केली. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे उत्पादनात वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अनिल गव्हाणे, अन्न व औषधी प्रशासनाचे वर्षा रोडे, बजाज, सागर गॅस सर्व्हिसेचे वितरण प्रमुख सचिन मुळे, तांत्रिक विभागाचे गणेश शेलगावकर, लेखा विभागाचे सचिन जाधव आदींची उपस्थिती होती. या पाहणीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या प्रकल्पात दररोज किती ऑक्सिजनचे उत्पादन होते, याची माहिती घेतली. या प्रकल्पात हवेतून ओढून दररोज जवळपास ७०० ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाते. या शिवाय लिक्विड दररोज उपलब्ध झाल्यास जवळपास ४०० ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जात असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या शहरात व वाळूज महानगरात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने खासगी रुग्णालयाकडून कोविड रुग्णांना हलविण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे व्हेंटिलेटरवर शेकडो रुग्ण जीवन-मृत्यूच्या चक्रव्यूहात अडकले होते.
फोटो ओळ- वाळूज एमआयडीसीतील सागर गॅस सर्व्हिसेस या ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली व कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या.
-------------------