हिंगोली : जिल्हा परिषदेत नूतन पदाधिकारी निवडीच्या हालचाली अजूनही दिसत नाहीत. स्पष्ट बहुमत असल्याने सेना निश्चिंत आहे. तर यावेळी चमत्कार घडविण्यासाठी उत्सुक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्याही काही हालचाली दिसत नाहीत. यावेळचे अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. तर जि.प.सभागृहात शिवसेना-२७, राष्ट्रवादी-१0, कॉंग्रेस-९ व अपक्ष ४ असे पक्षीय बलाबल आहे. अपक्षांपैकी तिघे कॉंग्रेस-राकॉंशी जोडलेले आहेत. त्यामुळे २२ पर्यंतचे संख्याबळ आपोआपच जुळलेले आहे. चौथा अपक्ष जोडला की, चार सदस्यांचीच गरज कॉंग्रेस-राकॉंला राहणार आहे.शिवसेनेला बहुमत असल्याने आपलीच सत्ता येणार याची खात्री बाळगून नेतेमंडळीसह सदस्यही शांत बसले आहेत. मागच्या वेळी गटा-तटाच्या राजकारणाने उफाळी घेतली होती. विधानसभेची किनार असल्याने गट-तटाची भूमिका न घेता एकत्रितपणे निर्णय व्हावा, असे सदस्यांना वाटत आहे. मात्र संपर्कप्रमुखांनी अद्याप या विषयावर ना बैठक बोलावली ना सदस्यांशी चर्चा केली. त्यामुळे शिवसेनेतील इच्छुक आता मोर्चेबांधणीसाठी प्रयत्न सुरू करण्याच्या तयारीत आहेत. तर गणेशोत्सव संपल्याशिवाय संपर्कप्रमुखही मुंबईतून बाहेर पडणार नाहीत. माजी खा. सुभाष वानखेडे, माजी आ. गजानन घुगे, माजी आ.जयप्रकाश मुंदडा व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा या प्रक्रियेत सक्रिय सहभाग असण्याची शक्यता आहे. शिवाय ही सूत्रे जुळल्यावरच पुढचे सर्व काही व्यवस्थित पार पडणार आहे.शिवसेनेतील गटतटाचे राजकारण उफाळले तर लागलीच संधी साधायची, असा प्रयत्न कॉंग्रेस व राष्ट्रवादीचा असला तरी त्यादृष्टीने प्रयत्न वा हालचाली दिसत नाहीत. यात खा. राजीव सातव, आ.जयप्रकाश दांडेगावकर, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभेपूर्वी जि.प.चे मैदान मारण्यासाठी योग्य आखणी केल्यास ते शक्य होण्याची चिन्हे मात्र आहेत. केवळ राजकीय मुत्सद्दीपणाचा कस लावावा लागणार आहे.शिवसेना व राष्ट्रवादीतील अनेकजण अध्यक्षपदासाठी उत्सुक आहेत. मात्र पुढचे फासे कस पडतील, यावरच सगळी भिस्त आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेकडून उत्सुक असलेल्यांमध्ये हयातनगर सर्कलच्या लक्ष्मीबाई यशवंते, वाकोडीच्या मंगला कुबडे, शेवाळ्याच्या पंचफुला सावंत यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्यांत शारदा केशव नाईक यांचा समावेश आहे. कॉंग्रेसकडेही या पदासाठी शारदा वैद्य, सीताबाई मस्के इच्छुक आहेत.शिवसेनेचे तिन्ही गट एकत्र आल्याची चर्चा आहे. तर माजी खासदार गटाचे अनिल कदम, राजेश्वर पतंगे मुंदडा गटाचे यशवंते, बळवंते यांना पदे मिळतील, अशी चर्चा आहे. घुगे गटाचे पत्ते उघड नाहीत.
जि.प.पदाधिकारी निवडीच्या हालचाली थंडच
By admin | Published: September 07, 2014 11:48 PM