सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मला सर्दी झाली आहे, खोकला थोडाच येत आहे, असे म्हणून एक मद्यपी रूग्ण जिल्हा रूग्णालयात शनिवारी रात्री १.२३ च्या सुमारास दाखल झाला. डॉक्टरांनी त्याच्यावर तत्कालीक विभागात उपचार सुरू केले. याचवेळी संबंधित मद्यपी रूग्ण बेडवरच धिंगाणा करू लागला. सोबतचे तीन-चार साथीदारही त्याला साथ देत होते. या विभागातील हा ‘गटारी गोंधळ’ बंद करण्यास मात्र कोणीच समोर आले नाही. यावरून रूग्णालय सुुरक्षिततेच्या बाबतीत ‘आजारी’ असून त्यावर उपाययोजनांचे ‘उपचार’ करण्याची गरज असल्याचे दिसून आले. ‘लोकमत’ने केलेल्या स्टींगमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरक्षिततेअभावी डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य रूग्णांमध्ये भितीचे वातावरण आहे.जिल्हा रूग्णालयात चांगले उपचार मिळतात. अपुरे डॉक्टर, कर्मचारी असले तरी रूग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी त्यांची धडपड असते. त्यामुळे जिल्हा रूग्णालये अनेक बाबींमध्ये राज्यात प्रथम आहे. रक्त संकलण, तांबी बसविणे, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, कुपोषित बालकांवर उपचार यासारख्या गोष्टींमध्ये रूग्णालय अव्वल आहे. परंतु काही ठराविक बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हा रूग्णालय बदनाम होत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम सर्वसामान्य रूग्णांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे.३२० खाटांच्या असणाऱ्या जिल्हा रूग्णालयात दररोज दोन हजाराच्या जवळपास बाह्य रूग्ण तपासणी होते. तसेच अॅडमिट असणाऱ्या रूग्णांची संख्या ७०० ते ८०० च्या जवळपास असते. तरीही रूग्णांना सेवा देण्यात अपवादात्मक प्रकार सोडले तर तत्परता असल्याचे दिसून येते. परंतु याच डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. सुरक्षा रक्षक, कर्मचारी रात्रीच्यावेळी मद्यपी रूग्णांपासून दुरच दोन हात लांब राहूनच सेवा देत असल्याचेही दिसून आले.दरम्यान, शनिवारी रात्रीही असाच काहीसा प्रकार घडला. एका मद्यपी रूग्णाला केवळ सर्दी झाली होती. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. गरज नसतानाही तो सलाईन लावण्याचा हट्ट धरू लागला. डॉक्टरांनी त्याला समजावण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. परंतु त्याने त्यांचे ऐकले नाही. सोबत असणारे आणखी तिघांनी यामध्ये आणखीणच भर टाकली. रूग्णाला सलाईन लावली अन् डॉक्टर दुसऱ्या रूग्णाकडे निघून गेले. याचवेळी सोबतच्या मद्यपींनी रूममध्येच धिंगाणा सुरू केला. मद्यपी रूग्णासोबत ते वाद घालत होते. अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत होते. एका सुशिक्षित व्यक्तीला त्यांनी एकेरी भाषा वापरून वाद घालण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ हा धिंगाणा झाल्यानंतर सोबतचे तिघे निघून गेले. मद्यपी रूग्णांने शौचास जाण्याचे कारण सांगून डॉक्टरांकडून सलाईन काढली. त्यानंतर तो सलाईन न लावताच निघून गेले. लावायची असेल तर सलाईन मी घरी घेऊन जातो, असा हट्ट डॉक्टरांकडे करीत असल्याचेही पहावयास मिळाले. हा सर्व प्रकार घडत असताना डॉक्टर व परिचारीकेशिवाय एकही पुरूष कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक इकडे फिरकला नाही, हे विशेष.
सुरक्षिततेत जिल्हा रुग्णालय ‘आजारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:02 AM