लातूर : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ४६ हजार शौचालयांची कामे पूर्ण झाली असून, मराठवाड्यातील पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणून देवणीला मान मिळाला आहे. संपूर्ण जिल्हा १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यादृष्टीने प्रशासन काम करीत असल्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी येथे सांगितले. जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी ध्वजारोहण झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, अपर जिल्हाधिकारी पुरुषोत्तम पाटोदकर, मनपा आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, २०१७ च्या खरीप हंगामापासून उन्नत शेती, समृद्ध शेतकरी मोहीम राबविण्यास प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत पीक प्रात्यक्षिके, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकरी प्रशिक्षण, सूक्ष्म सिंचन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जलयुक्त शिवार अभियानाचीही अंमलबजावणी सुरू असून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले आहे. पहिल्या टप्प्यात २०२ गावांची निवड करून ५ हजार ८१९ जलसंधारणाची कामे केली आहेत. लोकसहभागातून ६७ लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, २१४ किलोमीटरपर्यंतचे नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे झाली आहेत. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात १७६ गावांची निवड होऊन २ हजार १३५ कामे पूर्ण केली आहेत. संभाव्य पाणीटंचाईचा कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. पशुधन विकास योजनेंतर्गत ११ हजार ३३४ पशुधनाचा विमा उचलण्यात आला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या १ लाख ६३ हजार ४०८ सभासदांना १४ कोटी ९९ लाखांची व्याज सवलत देण्यात आली आहे. नियोजन समितीच्या निधीतून १३ हजार ७०० सभासदांना सुमारे २ कोटी रकमेचा लाभ दिला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
१५ आॅगस्टपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करणार
By admin | Published: May 02, 2017 11:45 PM