लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे. खड्ड्यांना औरंगाबादकर जाम वैतागले आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे मुरूम आणि मातीने बुजविले होते. पावसामुळे ही माती केव्हाच वाहून गेली. छोटे छोटे खड्डे आता अधिक मोठे झाले असून, दुचाकी वाहनधारकांसाठी ते मृत्यूदूत बनून ठिकठिकाणी उभे आहेत. शहरात खड्ड्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली असतानाही मनपा प्रशासन झोपेत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पुढील कोणतेही नियोजन प्रशासनाकडे नाही.पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी सुमारे ४० लाख देशी-विदेशी पर्यटक येतात. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने येणाºया पाहुण्यांचा ओघही सतत कायम असतो. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या पर्यटन स्थळांमुळे औरंगाबादची ख्याती जगभर पसरलेली आहे. स्थानिक महापालिका प्रशासनामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. शहरात कोणत्याच मूलभूत सोयी- सुविधा नसल्याने शहरात आलेल्या पाहुण्यांना कशासाठी आपण आलो आहोत, असा प्रश्न पडतो. यंदा जून महिन्यात बºयापैकी पाऊस झाला. तेव्हाच खड्ड्यांचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. नंतर गणेशोत्सवानिमित्त खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. राजकीय दबावापोटी का होईना प्रशासनाने लाजत लाजत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवरील खड्डे मुरूम, खडी, मातीने बुजविले. मनपाच्या नऊ वॉर्ड कार्यालयांनी मिळून सुमारे ५ हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा करण्यात आला. या कामापोटी लाखो रुपयांचे बिलही तयार करण्यात आले.मागील काही दिवसांमध्ये झालेल्या संततधार पावसाने महापालिकेने केलेले काम पूर्णपणे वाहून गेले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहनधारकांना सहन करावा लागतोय. चारचाकी वाहनांचे सस्पेन्शन बºयापैकी असते. त्यामुळे त्यांना फारसा त्रास जाणवत नाही. महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी चारचाकी वाहनांमध्ये फिरतात. त्यामुळे त्यांनाही औरंगाबादकरांचे दु:ख कळायला तयार नाही.पावसाळा संपल्यावर तरी शहरातील खड्डे डांबराच्या साह्याने पॅचवर्क करून बुजविण्याची तूर्त कोणतीही योजना मनपा प्रशासनाकडे नाही. आणखी काही महिने औरंगाबादकरांना या मोठमोठ्या खड्ड्यांचा त्रास असाच सहन करावा लागणार हे निश्चित. मनपा प्रशासन आणि पदाधिकारी सध्या १०० कोटींच्या निविदा काढणे, कंत्राटदार ‘निश्चित’करणे यात व्यस्त आहे.
शहर खड्ड्यात; मनपा झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:57 AM