औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने १५ दिवसांच्या सुटीनंतर बुधवारी रुजू झाल्या, तर दुसरीकडे पुण्यातून शिक्षण आयुक्तांनी बुधवारी सहायक संचालक एम. के. देशमुख यांच्याकडे विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविल्याने शिक्षण विभागातील गोंधळ चव्हाट्यावर आला.
यासंदर्भात विभागीय सचिव सुगता पुन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या. १४ ते ३० जूनपर्यंत मी रजेचा अर्ज केला होता. बुधवारी कार्यालयात रुजू झाले. शिक्षण आयुक्तांचा आदेश अद्याप कार्यालयाला प्राप्त झाला नाही.
या आदेशावरून शिक्षण विभाग आणि राज्य परीक्षा मंडळातील असमन्वय पुढे आला. नियमित सचिव रुजू झालेल्या असताना अतिरिक्त पदभाराबद्दल निघालेल्या आदेशाची बोर्डासह शिक्षण विभागात चर्चा रंगली होती.
---
माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे प्राथमिकचीही जबाबदारी
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल हे बुधवारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी यासंबंधी आदेश बुधवारी दिले. त्यामुळे त्यांच्याकडे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सुमारे साडेचार हजार शाळा-महाविद्यालयांची जबाबदारी आली आहे.