- जयंत कुलकर्णी
औरंगाबाद : जगात अशक्य काही नाही. निर्धार केला की, अशक्यप्राय बाबही शक्य करून इतिहास रचता येतो, हे सिद्ध केले आहे औरंगाबादचेदिव्यांग खेळाडू निकेत दलाल यांनी. दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्यानंतरही जिगरबाज निकेत दलाल यांनी दुबई येथे भारताचा पहिला दिव्यांग आयर्नमॅनचा किताब नुकताच पटकावला. आता आपले पुढील लक्ष्य हे पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या स्पर्धेत अल्ट्रा आयर्नमॅन किताब मिळवण्याचे असल्याचे मत औरंगाबादचे दिव्यांग खेळाडू निकेत दलाल यांनी दुबई येथून ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निकेत दलाल यांनी दुबई येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत धावणे, सायकलिंग आणि स्विमिंग या तिन्ही गटांत जबरदस्त कामगिरी करताना आयर्नमॅनचा किताब पटकावला. दुबई येथील स्पर्धेत १९०० मी. जलतरण, ९० कि.मी. सायकलिंग आणि २१ कि.मी. रनिंग हे तिन्ही प्रकार साडेआठ तासांत करायचे असतात; परंतु निकेत यांनी हे अंतर ७ तास ४४ मिनिटांत पूर्ण केले. त्यांनी १९०० मी. स्विमिंग १ तास ०२ मि., ९० कि. मी. सायकलिंग ३ तास १६ मि. आणि २१ कि.मी. रनिंग हे ३ तास ११ मिनिटांत पूर्ण केले. अशी कामगिरी करणारे ते दिव्यांग खेळाडू म्हणून पहिले भारतीय व जगातील पाचवी व्यक्ती ठरले. त्यांना अरहाम शेख यांची साथ लाभली, तर चेतन वेल्हाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
या जबरदस्त कामगिरीनंतर त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. निकेत दलाल यांनी त्यांचे आगामी लक्ष्य याविषयी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘या वर्षी गोवा येथे स्विमिंगथॉन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा पूर्ण करण्याचे आपले पहिले लक्ष्य आहे. त्यानंतर सुपर रँडोनियर्सअंतर्गत २००, ४०० व ६०० कि. मी. सायकलिंग करायची आहे. गोवा येथे नोव्हेंबर महिन्यात गोवा आयर्नमॅनमध्ये आपण सहभागी होणार आहेत. २०२१ मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या स्पर्धेत अल्ट्रा आयर्नमॅनचा किताब पटकावणे हे आपले लक्ष्य असणार आहे.’’
दुबई येथील आपल्या यशाबद्दल बोलताना निकेत दलाल म्हणाले, ‘‘भारत आणि आशिया खंडात दिव्यांग व्यक्तीने आयर्नमॅन किताब पटकावला नाही. आपण हे केले पाहिजे, अशी जिद्द मनात आली व ही जिद्द पूर्ण केली. २०१५ मध्ये खुल्या गटातील भारताचा आयर्नमॅन झाला आणि १५ वर्षांनंतर एक भारतीय दिव्यांग खेळाडू म्हणून आयर्नमॅनचा किताब पटकावल्याचा मनस्वी आनंद वाटतोय.’’ निकेत दलाल यांना पाच वर्षांपूर्वी काचबिंदू झाला आणि त्यातच त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली; परंतु अचानक आलेल्या या संकटामुळे ते खचून गेले नाही आणि नव्या उमेदीने त्यांनी सायकलिंग, रनिंग आणि स्विमिंगचा छंद जोपासला व स्पर्धेत सहभाग घेतला.
जिद्दीने केली अखेरची १0 कि. मी. अंतर पूर्णखूप थकवा आला होता. त्यामुळे अखेरचे १0 कि. मी. अंतर असताना शर्यतीतून माघार घ्यावी असे एकवेळ वाटले होते; परंतु आता सोडून दिले तर दिव्यांग व्यक्ती काही करू शकत नाही, अशी भावना निर्माण होईल आणि आता हीच वेळ आहे, असा निर्धार केला व जिद्दीने अखेरचे दहा कि. मी. अंतर पूर्ण केले, असे निकेत दलाल यांनी सांगितले.मुंबईत समुद्रात सराव केल्यामुळे दुबईला स्विमिंग करण्यासाठी अडचण भासली नाही. अन्य देशांतील खेळाडूंना सरकारचे पाठबळ असते. त्यांना प्रायोजक मिळतात; परंतु आपल्या येथे फक्त क्रिकेटलाच पाठबळ दिले जाते. औरंगाबाद येथे सिद्धार्थ जलतरण तलाव, एमजीएम आणि पुणे येथे सराव केला. कठोर सराव केल्यामुळेच ही कामगिरी करता आली, असे निकेत दलाल म्हणाले.