औरंगाबाद : मनपाच्या कार्यपद्धतीच्या निषेधार्थ शहरातील दिव्यांगांकडून महापालिकेसमोर 'गाजर दाखवा' आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये शहरातील दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी दिव्यांगी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.महापालिकेकडे २०१३ पासून दिव्यांगांसाठी राखीव असलेला १० कोटी ५० लाखांचा निधी पडून आहे. गेल्या सहा वर्षांत मनपाने छदामही दिव्यांगांसाठी खर्च केलेला नाही. त्यामुळे शहरातील दिव्यांगांकडून संताप होत आहे.
दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी महापालिकेच्या उत्पन्नातून दरवर्षी तीन टक्के निधी राखून ठेवला पाहिजे, असे शासनाचे कार्यादेश आहेत; परंतु यास महापालिकेने वेळोवेळी केराची टोपली दाखविली. दिव्यांगांच्या अनेक कल्याणकारी योजना धूळखात आहेत. त्यामुळे वर्षभरापासून दिव्यांगांच्या संघटनांकडून आंदोलन केले जात आहे.
आंदोलनकर्त्या दिव्यांगांनी शासन निर्णयाप्रमाणे राखीव निधी खर्च करणे, दिव्यांगांना मासिक मानधन देणे, ४० टक्क्यांवरील दिव्यांगांना मनपाने योजनांचा लाभ देणे, मनपाच्या शॉपिंग सेंटरमध्ये व शहरातील विविध भागांत दिव्यांगांना व्यवसायासाठी गाळे, जागा उपलब्ध करून देणे, दिव्यांगांना घरपट्टी, नळपट्टीत सवलत देणे, शहरातील रात्र निवारे दिव्यांगांना चालविण्यास देणे, दिव्यांगांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशा विविध मागण्या केल्या आहेत.
पहा व्हिडिओ :