बीड : परळीतील संच बंद पडल्याने जिल्ह्यात अनियमित वेळी भारनियमन होत आहे. ऐन दिवाळी सणात भारनियमन होऊ नये याकरिता महावितरणने जिल्ह्यातील कृषीपंपधारक ग्राहकांचे भारनियमन वाढवले आहे तर घरगुती ग्राहकांची ऐन सणात गैरसोय होऊ नये म्हणून ९ ते १३ नोव्हेंबरपर्यंत भारनियमनमुक्त केले आहे. अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील ४०० केव्ही उपकेंद्रावर बीड जिल्ह्यासह इतर चार जिल्ह्यांचा भार पडत असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून भारनियमनात वाढ होत आहे. मुख्य कार्यालयाकडून ९ ते १३ नोव्हेंबरपर्यंत विभाग भारनियमनमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील परिस्थिती नाजूक असल्याने भारनियमनाची नामुष्की विभागावर ओढावली आहे. यावर पर्याय काढत विभागीय कार्यालयाने जिल्ह्यातील कृषीपंपधारकांचे भारनियमन वाढवले आहे. यापूर्वी शेतीपंपावरील फीडरला दिवसातून ८ तास विद्युत पुरवठा केला जात होता. रविवारपासून केवळ सहा तास पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. फीडरच्या संख्येनुसार काही भागात सकाळी ६ ते दुपारी १२, काही ठिकाणी दुपारी १२ ते ६ तर काही फीडरवर सायंकाळी ६ ते रात्री १२ असा वीजपुरवठा करण्यात आला. कृषीपंपधारकांच्या ८ तासांच्या विद्युत पुरवठ्यात दोन तासांची कपात करून विभागातील घरगुती ग्राहकांकडे वळविण्यात आला आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना अतिरिक्त भारनियमनापासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
भारनियमनमुक्तीची दिवाळी भेट
By admin | Published: November 08, 2015 11:19 PM