लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा भेटीसाठी दिल्लीकडे रवाना होताना औरंगाबादेतील दिल्ली दरवाजातून जाणाऱ्या मार्गाचीच निवड केली होती, अशी माहिती इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी यांनी दिली.औरंगाबाद शहराचे वैभव असलेल्या विभागीय आयुक्तालय, सुभेदारी विश्रामगृह, दिल्ली दरवाजा आणि सलीम अली सरोवर परिसरात औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे रविवारी (दि.८) हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. या वॉकची सुरुवात विभागीय आयुक्तालयाच्या इमारत परिसरापासून झाली. यावेळी इतिहासतज्ज्ञ रफत कुरेशी आणि डॉ. दुल्हारी कुरेशी यांनी स्थळांची माहिती दिली. विभागीय आयुक्तालयाची इमारत इतिहासात ‘आयना खाना’ नावाने ओळखले जाई. बादशहा औरंगजेबच्या निधनानंतर असिफजहाँ स्वतंत्र झाला. त्यांच्या कार्यकाळातच बारादरी परिसर बांधला गेला. सहावा निजाम महमूद अली पाशा यांनी परिसराची सजावट, सुशोभीकरणाला प्राधान्य दिले. या कालखंडातील स्थापत्यशिल्पे ही वेगळ्या शैलीतील आहेत. मोगलशाहीत मिनार मोठ्या आकाराचे बांधण्यात येत असत. मात्र आसिफजहाँने मिनार छोटे-छोटे बांधून स्थापत्य रचना बदलली. सुभेदारी गेस्ट हाऊसची निर्मिती १७२४ ते ४८ या काळात झाली. हेरिटेज वॉकचा समारोप सलीम अली सरोवर येथे झाला. येथील जैव विविधतेची माहिती चंद्रेशखर बोर्डे, स्वप्नील जोशी यांनी दिली. या हेरिटेज वॉकमध्ये मनपा आयुक्त डॉ. विनायक निपुण, त्यांच्या पत्नी, उपायुक्त मुथा, प्रदीप देशपांडे, डॉ. एजाज शेख, लतीफ शेख, डॉ. कामाजी डक सहभागी होते.
आग्रा भेटीसाठी शिवाजी महाराजांचे दिल्ली दरवाजातूनच प्रयाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 1:12 AM