औरंगाबाद : दसरा व दिवाळी हे महासण पुढील महिन्यातच येत आहेत. यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने दुष्काळाचे सावट हटले आहे. तसेच पहिल्या पंधरवड्यात दसरा व दुसऱ्या पंधरवड्याच्या अखेरीस दिवाळी येत असल्याने आॅक्टोबरचा पगार व दिवाळीचा बोनस तसेच नोव्हेंबरचा आगाऊ पगार असा दोन महिन्यांचा पगार हाती येणार असल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पैसा येणार आहे. या सकारात्मक वातावरणाचा फायदा उचलण्यासाठी व्यापारीवर्गाची लगीनघाई सुरूझाली आहे. या महासणात बाजारपेठेत ७०० कोटींची उलाढाल होणार असल्याचा होरा व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (पान ५ वर)पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, गणेशोत्सवात इलेक्ट्रॉनिक्स बाजारातील उलाढालीत मागील वर्षीपेक्षा २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. येत्या दसरा-दिवाळीदरम्यान २५ ते ३० टक्के वाढ अपेक्षित आहे. त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. ४महासणात एलईडी टीव्हीची सर्वाधिक विक्री होत असते तसेच मागील वर्षीपेक्षा १० ते १५ टक्के किमती घटल्याने टीव्हीची विक्री आणखी वाढेल. याशिवाय फ्रीज, मायक्रोव्हेव, वॉशिंग मशीन आदींनाही चांगली मागणी राहील. कंपन्यांनी आपल्या विशेष योजना जाहीर केल्या आहेत. किराणा बाजारात ४० कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार असल्याचे सांगितले जात आहे. टिंकू खटोड या व्यापाऱ्याने सांगितले की, दसरा-दिवाळीत खाद्यतेल व वनस्पती तुपाची मोठी विक्री होते. त्यात वनस्पती तुपाचा तुटवडा मागील वर्षी निर्माण झाला होता. ऐन वेळेवर गोंधळ नको म्हणून किराणा व्यापाऱ्यांनी कंपन्यांकडे वनस्पती तुपाची आगाऊ नोंदणी करणे सुरू केले आहे. कमिशन एजंट प्रकाश जैन म्हणाले की, दिवाळीनिमित्त भडंग मुरमुरे व पोह्याची आगाऊ नोंदणी होत असून १ आॅक्टोबरपासून माल येण्यास सुरुवात होईल.कपडे खरेदीसाठी व्यापारी परराज्यात नवनवीन फॅशनच्या कपडे खरेदीसाठी व्यापारी परराज्यात गेले आहेत. अजय तलरेजा यांनी सांगितले की, साडीसाठी कोलकाता, बनारस, बंगळुरू, मदुराई, सुरत. शर्टिंग-सूटिंग्साठी मुंबई, भिलवाडा, पंजाबी ड्रेससाठी अहमदाबाद, सुरत तर लहान मुलांचे कपडे मुंबई व कोलकाता येथून येणार आहेत. आॅर्डर बुक करणे सुरू झाले असून १ आॅक्टोबरपासून नवीन स्टॉक बाजारात येण्यास सुरुवात होईल. औरंगाबाद जिल्हा मोबाईल विक्रेता असोसिएशनचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वरअप्पा खर्डे यांनी सांगितले की, मोबाईल उत्पादक प्रमुख कंपन्यांनी प्रत्येक विक्रेत्याला ३० टक्के वाढीव उद्दिष्ट दिले आहे. तसेच १५ हजारांवरील मोबाईल खरेदीवर अर्थसाहाय्य उपलब्ध झाले आहे. पुढील महिन्यात ४० कोटींचे मोबाईल विक्री होतील, असा कंपन्यांनी अंदाज व्यक्त केला.
दिवाळीत होणार ७०० कोटींची उलाढाल
By admin | Published: September 21, 2016 12:10 AM