लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : किया मोटार्सने आंध्र प्रदेशात आपले बस्तान बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर हवालदिल झालेल्या डीएमआयसीच्या वरिष्ठांनी चीनच्या एसएआयसीकडे (शांघाय आॅटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पाेरेशन) गुंतवणुकीसाठी मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद येथे कंपनीने ग्रीनफिल्ड प्लांट सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकार ‘एसएआयसी’शी बोलणी करीत असल्याचे वृत्त उद्योगवर्तुळात आहे.सहा चायनीज आॅटोमोबाईल्स कंपन्या २०१९ पर्यंत भारतात येण्यास इच्छुक आहेत. त्यातील शांघाय आॅटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पाेरेशन हा चारचाकी वाहनांचे उत्पादन करणारा मोठा ग्रुप आहे. गुजरात, पुणे आणि औरंगाबाद हे तीन लोकेशन कंपनीने गृहीत धरली आहेत. मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी कंपनीने अद्याप स्थान निश्चित केले नसले तरी गुजरात, पुणे, औरंगाबाद (आॅरिक) यापैकी एका ठिकाणाकडे कंपनी भौगोलिकदृष्ट्या गुंतवणुकीच्या विचारात आहे. पुण्यातील तळेगाव येथेही कंपनी गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहत आहे. गुजरातमधील हलोल येथील जनरल मोटार इंडियाचा कारखाना बंद करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्या कंपनीचे तयार इन्फ्रास्ट्रक्चर मिळाले, तर लवकर उत्पादन सुरू होण्याच्या दृष्टीने कंपनी विचार करीत असल्याची माहिती उद्योग वर्तुळातून पुढे आली आहे. डीएमआयसीच्या अधिकाऱ्यासंह राज्याच्या उद्योगखात्याला आणि राजकीय नेत्यांना आता हा प्रकल्प मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. १०० अब्ज डॉलरचा वार्षिक महसूल असलेल्या एसएआयसीने भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची योजना जाहीर केली आहे. २०२० पर्यंत जगभरातील आघाडीच्या तीन आॅटोमोबाइल बाजारपेठांमध्ये कंपनी स्पर्धेत उतरणार आहे. कंपनी भारतीय बाजारपेठेत येण्यासाठी उत्सुक असून, एमजी मोटार्स इंडियाच्या माध्यमातून उत्पादन निर्मिती करण्याची घोषणा कंपनी केली आहे. कंपनीचे प्रत्यक्ष उत्पादन २०१९ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. ग्रीनफिल्ड प्रकल्पात रेडी इन्फ्रास्ट्रक्चरसह नेटवर्क ताब्यात घेण्याची तयारी असते. रेडी नेटवर्क जिथे असेल तेथे एसएआयसी जाऊ शकते.
डीएमआयसीचा मोर्चा आता एसएआयसीकडे
By admin | Published: June 30, 2017 12:12 AM