औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपतींनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी (दि.५) घेतल्या. यास चार दिवस उलटले तरी अद्यापही कुलगुरूंची निवड होत नाही. राज्य शासनातील काही मंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे निवड लांबणीवर पडत आहे. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायचे की, बाहेरच्या यावर एकमत होत नसल्यामुळे ही निवड रेंगाळली असल्याचे समजते.विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच जणांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये नागपूरचे डॉ. प्रमोद येवले आणि औरंगाबादचे डॉ. के.व्ही. काळे यांच्यात चुरस असल्याचे चित्र पहिल्यापासून निर्माण झाली होती. औरंगाबाद येथील सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. काळे यांचे नाव लावून धरले होते. तशा पद्धतीचे संदेश मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचविण्यात आले होते. त्याचवेळी राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या नागपुरातील डॉ. येवले यांनी जोर लावल्यामुळे ही निवड थांबली आहे. शनिवार व रविवार राज्यपाल दौºयावर होते. त्यामुळे निर्णय झाला नाही. सोमवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, औरंगाबादच्या दौºयावर आलेले जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनीही कार्यकर्त्यांशी बोलताना कुलगुरूंची निवड लांबण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे कुलगुरूंच्या निवडीमध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप सुरू असल्यामुळे निवड लांबणीवर गेली आहे. कुलगुरूंच्या निवडीची उत्सुकताही ताणल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात कोण होणार कुलगुरू? या चर्चेला उधाण आले आहे. डॉ. येवले व डॉ. काळे यांच्यासह नांदेड येथील डॉ. रघुनाथ होळंबे, कोल्हापूर येथील डॉ. विजय फुलारी, नाशिक येथील डॉ. धनंजय माने हे सुद्धा स्पर्धेत आहेत. यात आघाडीवर असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात हितचिंतकांनी तक्रारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इतर नावांचाही विचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चौकट,विधि विद्यापीठाचे त्रांगडे सुटेनाऔरंगाबादेतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवडही लांबली आहे. या विद्यापीठाला मागील सहा महिन्यांपासून पूर्णवेळ कुलगुरू नाही. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने १४ जणांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यापैकी चार नावांची शिफारस कुलपतींकडे केली. मात्र, अद्यापही कुलपतींनी निर्णय घेतलेला नाही. यामुळे औरंगाबादेतील दोन्ही विद्यापीठे कुलगुरूंच्या प्रतीक्षेत आहेत.