औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात पर्मनंट लायसन्ससाठी चारचाकी वाहनांसाठी चाचणी घेताना चालकाशिवाय अन्य कोणीही बसू नये, असा आदेश वर्षभरापूर्वी काढण्यात आला होता; परंतु या आदेशाचा सर्वांना विसर पडला होता. आता पुन्हा एकदा या आदेशाचे स्मरण झाले असून चाचणीदरम्यान चालकाशेजारी इतर व्यक्तीस बसण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे ही चाचणी वाहनचालकांसाठी चांगलीच कसोटीची ठरत आहे.आरटीओ कार्यालयात वर्षभरापूर्वी एका चारचाकी वाहनचालकाने चाचणीदरम्यान समोरील वाहनास धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अनेक चालक प्रशिक्षित नसतानाही पर्मनंट लायसन्सची चाचणी देत असल्याचे समोर आले, अशा अप्रशिक्षित चालकांना चारचाकी चाचणीदरम्यान शेजारी बसणाऱ्या एजंट अथवा इतर व्यक्तीकडून मदत केली जाते; परंतु प्रत्यक्षात रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ही चाचणी अधिक कडक व्हावी आणि प्रशिक्षित चालकांनाच पर्मनंट लायसन्स मिळावे, यासाठी चालकाशेजारी कोणीही बसू नये, असा आदेश काढण्यात आला होता; परंतु अवघ्या काही दिवसांतच या आदेशाचे विस्मरण झाले; परंतु वर्षभरानंतर पुन्हा एकदा या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. ‘तू स्टिअरिंगवर बस फक्त’...‘तू स्टिअरिंगवर बस फक्त...बाकी मी सांभाळून घेतो’ असा सल्ला नव्या वाहनचालकांना दिला जातो; परंतु हा सल्ला देणाऱ्यांवर आता चाप लावला आहे. त्यामुळे त्यांच्या भरवशावर येणाऱ्या चालकांची चांगलीच कोंडी होत आहे. अनेक अप्रशिक्षित चालकांची बुधवारी रिव्हर्स टेस्ट ट्रॅक आणि चढ चढाव्या लागणाऱ्या ट्रॅकवर परिस्थिती समोर आली.
चारचाकीत चालकाशेजारी बसण्यास मज्जाव
By admin | Published: October 07, 2016 12:41 AM