औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवत नाही तोपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये, अशी एकमुखी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित एल्गार परिषदेत शनिवारी येथे करण्यात आली.
मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे शनिवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात एल्गार परिषद घेण्यात आली. परिषदेच्या सुरुवातीला शाहीर सुरेश जाधव यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला. यावेळी परिषदेचे संयोजक रमेश केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने ५४ मूकमोर्चे काढून एसईबीसी आरक्षण मिळविले. मात्र, या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. यानंतर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा उमेदवारांच्या भवितव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना हे समाजाला न्याय देऊ शकत नाही. यामुळे त्यांना पदावरून हटवून जाणकार व्यक्तीला आरक्षण समितीचे अध्यक्ष करा, अशी मागणी करण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटीचा निधी द्यावा. कोपर्डीच्या निर्भयाला न्याय देण्यासाठी तातडीने आरोपींना फासावर लटकविण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा तरुण स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एल्गार परिषद घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी शैलेश भिसे, डाॅ. वनारसे, किरण काळे पाटील, मनोज मुरदारे, शुभम केरे, तेजस पवार, भरत कदम, पंढरीनाथ गोडसे, अप्पासाहेब जाधव, मोतीभाऊ वाघ यांच्यासह सुमारे ३०० युवक व युवती उपस्थित होते.
==========
चौकट
...तर २८ रोजी क्रांती चौकात ठिय्या
२५ जानेवारी रोजी मराठा आरक्षणावरील स्थगिती न उठल्यास २८ जानेवारीपासून क्रांती चौकात ठिय्या देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शहराचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास विरोध दर्शविणाऱ्या मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.