सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगाव येथे आरोग्यसेवेच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्याचे दिसून येत आहे. येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने पदे रिक्त असल्यामुळे वैद्यकीय केसेस, तसेच शवविच्छेदनासाठी रुग्ण पाठवू नयेत, असे पत्र सोयगाव, फर्दापूर पोलिसांना पाठविले आहे. या प्रकाराबाबत चोहोबाजूंनी रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. सध्या दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय गाठावे लागत असून, वरिष्ठांनी दखल घेऊन सोयगावातील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.
जवळपस एक लाख रुग्णांच्या आरोग्याची देखभाल करणाऱ्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आरोग्य उपसंचालकांनी (औरंगाबाद)आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आदेशावरून सोयगावला २७ दिवसांसाठी जिल्ह्यातील २७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिदिन महिनाभर प्रतिनियुक्ती केली होती; परंतु या २७ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्याने आठवडाभरापासून सोयगावचे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्याविना आहे.
यामुळे चक्क आरोग्य विभागाने सोयगाव आणि फर्दापूर पोलीस ठाण्यांना याठिकाणी वैद्यकीय केसेस व शवविच्छेदनासाठी न येण्याचा लेखी पत्र पाठवून पर्यायी व्यवस्था करण्याचा अजब सल्ला दिला आहे. त्यामुळे दोन्ही पोलीस ठाण्यांची मोठी अडचण झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले की, सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नाहीत. त्यामुळे पोलीस प्रकरणात झालेली वादावादीच्या गंभीर रुग्णांना, औषध प्राशन केलेल्या रुग्णांना व आत्महत्या केलेल्यांचे शवविच्छेदन रुग्णालयात मनुष्यबळाअभावी केले जाणार नाही. त्यामुळे पोलिसांनी यापुढे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात अशा प्रकारचे रुग्ण पाठवू नयेत, असा एक प्रकारे इशाराच दिल्याने पोलिसांच्या अडचणीत भर पडली आहे.
त्या मयतांच्या शवविच्छेदनासाठी तारांबळदरम्यान, मंगळवारी सोयगाव तालुक्यात म्हशिकोठा येथे तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर सोयगाव शहरात एका बसचालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यावर पाचोरा (जि. जळगाव) येथे, तर सोयगावच्या बस आगारातील चालकावर सोयगाव ग्रामीण रुग्णालयात अजिंठा येथून सर्जन बोलावून रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याची वेळ पोलिसांवर आली होती.
अडचण येत आहे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसल्याने याठिकाणी पोलीस केसेस न आणण्याचे पत्र प्राप्त झाल्याने मोठी चिंता वाढली आहे. त्यामुळे फिर्यादीवर आरोग्य उपचार व आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे सध्या आम्हाला सोयगाव येथून चक्क सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. -शेख शकील (पोलीस निरीक्षक, सोयगाव पोलीस ठाणे)
मनुष्यबळ कमी पडत आहे सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचा पदभार घेतल्यापासून याठिकाणी मनुष्यबळ कमी पडत असल्याने आरोग्यसेवा ढेपाळली आहे. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण रुग्णालयात आरोग्यसेवा पुरविणे अशक्य झाले असल्याने पोलिसांना तात्पुरती व्यवस्था करण्याचे लेखी पत्र आदेशावरून देण्यात आले आहे. -डॉ. एस.बी. कसबे (वैद्यकीय अधीक्षक, सोयगाव)