- मल्हारीकांत देशमुख
औरंगाबाद : या देशातील लोककला व कलावंतांना शास्त्राच्या चौकटीत बंदिस्त न करता त्यांना प्रोत्साहन द्यावे. लोकसंगीत म्हणजे गावठी संगीत नव्हे, खरे तर पारंपरिक बाबी जीवापाड जपल्यात. या देशात शास्त्र आणि परंपरा सोबतच सुरू झाल्या आहेत, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील डॉ. सुनिरा कासलीवाल यांनी केले.
महागामीच्या शारंगदेव महोत्सवातील रविवारचे चर्चासत्र त्यांनी गुंफले. राजस्थानी लोककलेविषयी त्या म्हणाल्या की, ७०० वर्षांपासूनचे रावणहत्ता हे वाद्य येथील भोपी (भिल्ल) जमातीचे लोक वाजवतात. हे वाद्य ते स्वत: तयार करतात. त्याचे वादन करीत गातात व नृत्यही करतात. ही गोष्ट अभावानेच पाहावयास मिळते. आम्ही अज्ञजणांच्या प्रस्तुतीकरणात गाणारा वेगळा, वाजवणारा दुसरा, तर नृत्य करणारा तिसरा असतो. आम्ही आमचे वाद्य तयार करू शकत नाही. मग खरे निष्ठावान कोण? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आज चित्रपटात राजस्थानी संगीतावर आधारित गीते येत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. आमच्या प्रदेशातील संगीतकारांना यानिमित्ताने संधी मिळते आहे, असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी सांगितले.
सुगनाराम अन् रावणहत्तासुगनाराम भोपा हा राजस्थानातील जोधपूरनजीक बाकाराशनी गावचा भिल्ल जमातीतील कलावंत. रावणहत्ता वादकाच्या घराण्यातला १७ व्या पिढीचा कलावंत, ज्याने या चर्चासत्रात आपल्या चौफेर व्यक्तित्वाचा परिचय करून दिला. रावणहत्ता वाद्याचा इतिहास सांगताना ‘पाबुजी महाराज’ या लोकदेवतेला प्रसन्न करण्यासाठी हे वाद्य वादन केले जाते. रावणाने तयार केलेले हे वाद्य आमची ओळख आहे. हे केवळ आम्हीच तयार करतो, असे सांगताना त्यांनी स्टेजवर रावणहत्ता स्वत:च्या हाताने पूर्णत: उखळून पुन्हा नव्याने तयार करून दाखविला. त्यानंतर सुगनाराम कोष्टीवाल यांनी राजस्थानी भाषेतील लोकगीतांचा नजराणा बहाल केला. आम्ही सगळे रावणाचे शिष्य असलो तरी आमच्या प्रत्येकाच्या नावामागे आम्ही ‘राम’ हा शब्द लावतो, असे ते म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मौखिक परंपरेचा आदर करा -डॉ. इंद्रायणी चक्रवर्तीशिक्षित लोकांनी परंपरेला तिलांजली दिली असली तरी ग्रामीण अर्धशिक्षित लोकांनी परंपरा चालविल्या, वाढविल्या आहेत. आपल्या कलेतील कुठलेही व्याकरण त्यांना अवगत नसले तरी केवळ मौखिक परंपरेतून त्यांनी त्याचे जतन केले आहे. आपण त्यांचे सदैव ऋणी राहावे, असे प्रतिपादन वाद्य संगीताच्या अभ्यासिका कोलकाता येथील डॉ. इंद्रायणी चक्रवर्ती यांनी केले. तंतुवाद्यात मास्टरी असणार्या डॉ. चक्रवर्ती यांनी ‘किन्नरीवादनशैली’ या विषयावरील त्यांच्या प्रबंधाचे वाचन करीत श्रोत्यांशी संवाद साधला.
वैदिक वाङ्मयात वारंवार उल्लेख होणार्या किन्नरीवाद्याला फार मोठी परंपरा असून, ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथात शारंगदेवांनी किन्नरीचे विविध प्रकार व वादनशैलीची चर्चा केली आहे. सबंध आशिया खंडात हे वाद्य प्रचलित आहे. आजघडीला तेलंगणा व कर्नाटकातील ग्रामीण भागात लोककलावंत अतिशय निष्ठेने त्याची जपवणूक करतात. वेगवेगळ्या प्रांतानुरूप भाषा बदलत असली तरी वादनशैली तीच आहे. किन्नरवादक महाभारताच्या कथा लावतात. धनुर्धर अर्जुन या वाद्याचा उद्गाता समजण्यात येतो, असे त्या म्हणाल्या. कर्नाटकात भाडिया जमातीने या वाद्याला जपले. मातंग मुनीचे हे माडिया वंशज आहेत. रामायणकालीन शबरी या जमातीची होती. मातंग किन्नडी व जोगी किन्नडी लोक या वाद्याचे पाईक असल्याचे त्या म्हणाल्या.