औरंगाबाद: आमचे हातावर पोट आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलं पाठविण्याची ऐपत कष्टक-यात नाही. मनपाची शाळा बंद करून चिमुकल्याचे शिक्षण हिरावून घेऊ नका, शाळा सुरूच ठेवा, असा आग्रह ब्रिजवाडी येथील पालकांनी शिक्षणाधिकारी व शिक्षणसभापती समोर आज धरला.
पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर राबराब राबायचे अन् पोरगा पाटीवर दोन अक्षर लिहीताना पाहुन कामातील थकवा निघून जातो. शिकुन मुलगा देखील साहेब होणार अशी आडाणी माता-पित्यात भावना रूजली आहे. औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या ब्रिजवाडी शाळेत पूर्वी बसण्यास जागा शिल्लक नसायची. याचप्रमाणे सध्या नारेगावच्या शाळेत कष्टक-याच्या पाल्याची तुफान गर्दी आहे. मात्र, शिक्षणाचा स्तर वाढविण्यावर भर देण्यापेक्षा मनपा शाळा बंद करण्यावर भर देत आहे हे योग्य नाही. मातीकाम करणा-यांची मुलं किमान मनपाच्या शाळे जातात त्यांना त्यांच्या मुलांना खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेण्यासाठी पाठवणे शक्य होणार नाही. यामुळे मजूराच्या मुलाची पिच्छेहाट करण्याचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. शाळा सुरू राहिलीच पाहिजे, असा आग्रह पालकांनी शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती, मनपाच्या अधिका-याकडे धरला.
शाळेतील उपस्थितीकडे लक्ष द्या...इतर शाळांंनी मुलांच्या प्रवेशासाठी गाजावाजा करून प्रवेश करून घेतले त्याच प्रमाणे शाळेच्या शिक्षकांनी उपायोजना का केली नाही. शाळेच्य आवारात सेवा सुविधा देऊन शाळेच्या इमारतीची डागडुजी करावी, अशी मागणी देखील पालकांनी केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी जेवढी जबाबदारी घ्यायला पाहिजे, त्याच्या दोनपट शिक्षकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. अशी मनोगत पालकांनी मांडले.
शुब्दसुमनाने अधिका-याचे स्वागत...शाळेची दुरूस्ती व इतर सेवा देणार असे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितल्यावर नागरिकांनी टाळ्याचा कडकडाटात शब्द सुमनाने अधिका-यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षण सभापती शोभा बुरांडे, वॉर्ड सभापती सुरेखा सानप,प्रदीप बुरांडे, भुयार, वॉर्ड इंजिनीअर पवार, जाधव, मुख्याध्यापक सपकाळ आदीसह नागरिकांची उपस्थिती होती.